चेन्नई : तुम्ही एकदा आपला दर्जा सिद्ध केल्यानंतर सर्वांच्याच अपेक्षा वाढतात. त्या पूर्ण करण्याचे खेळाडू म्हणून तुमच्यावर दडपण असते. या दडपणाचा, तसेच त्याच्यासमोर आलेल्या आव्हानांचा रविचंद्रन अश्विनने खुबीने आणि निडरपणे सामना केला आहे. त्यामुळेच त्याला यशाच्या शिखरावर पोहोचता आले आहे, अशा शब्दांत भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने ऑफ-स्पिनर अश्विनची स्तुती केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान अश्विनने ५०० कसोटी बळींचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो कुंबळेनंतरचा केवळ दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. अश्विनच्या नावे आता ५१६ बळी असून माजी लेग-स्पिनर कुंबळेने कसोटीत ६१९ बळी मिळवले होते. कसोटी कारकीर्दीत १०० सामने आणि ५०० बळी पूर्ण केल्याबद्दल तमिळनाडू क्रिकेट संघटनेच्या वतीने अश्विनचा सत्कार करण्यात आला. या सोहळयादरम्यान कुंबळेने अश्विनच्या यशस्वी कामगिरीचे कौतुक केले.

हेही वाचा >>> विश्वचषकात तंदुरुस्त होण्यासाठी केलेल्या घाईमुळे दुखापत आणखीच वाढली! भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडयाची कबुली

‘‘अश्विनसमोर विविध आव्हाने उभी राहिली. मात्र, या आव्हानांचा त्याने निडरपणे सामना करताना आपली प्रगती थांबू दिली नाही. दशकभराहूनही अधिक काळापासून तो देशाला सामने जिंकवून देत आहे. त्याने कामगिरीत जे सातत्य राखले आहे, ते वाखाणण्याजोगे आहे. तो इतरांसाठी आदर्श आहे,’’ असे कुंबळे म्हणाला.

‘‘भारतामध्ये तुम्ही आपला दर्जा सिद्ध केला आणि स्वत:साठी एक स्तर निर्माण केला, की त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी करणे सोपे नसते. प्रत्येक सामन्यात तुमच्याकडून खूप अपेक्षा केल्या जातात. गोलंदाज म्हणून तुम्ही पाच गडी बाद न केल्यास, त्याकडे अपयश म्हणून पाहिले जाते. अश्विनने या अपेक्षा खुबीने हाताळल्या आहेत. त्यामुळेच तो इतका यशस्वी ठरला आहे,’’ असेही कुंबळेने नमूद केले.

‘‘अश्विनचे आकडे उत्कृष्ट आहेत. चांगली कामगिरी करून समाधान मानणाऱ्यांपैकी अश्विन नाही. प्रत्येक दिवशी काही तरी नवे शिकण्यासाठी, कामगिरीत सुधारणा करण्यासाठी तो तत्पर असतो. हेच त्याला खास बनवते,’’ असेही कुंबळे म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kumble praise ravichandran ashwin for taking 500 test wickets zws