Anil Kumble questions on RCB’s strategy : आयपीएल २०२४ च्या हंगामासाठीचा लिलाव मंगळवारी दुबईत पार पडला. या लिलावात एकूण २३० कोटी रुपये खर्च करुन ७२ खेळाडूंची खरेदी करण्यात आले. सर्व १० आयपीएल संघांनी खेळाडू खरेदी केले आहेत आणि आगामी आयपीएल हंगामासाठी आपापल्या संघांची तयारी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) आयपीएल लिलावात ज्या प्रकारे खेळाडूंना खरेदी केले, त्यावर माजी कर्णधार अनिल कुंबळे अजिबात खूश नाहीत. त्यामुळे अनिल कुंबळे यांनी आरसीबीच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिओ सिनेमाशी बोलताना कुंबळे म्हणाले की, आयपीएल २०२४ च्या लिलावात आरसीबीचे कामगिरीचे रेटिंग सातच्या पुढे जाणार नाही. कारण ते रिलीज केलेल्या खेळाडूंच्या तुलनेत योग्य खेळाडूंची निवड करु शकले नाहीत. आरसीबीने लिलावापूर्वी ११ खेळाडूंना सोडले होते, त्यात वानिंदू हसरंगा, जोश हेझलवूड, हर्षल पटेल, फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल, केदार जाधव. तसेच लिलावात खरेदी केलेल्या खेळाडूंमध्ये सौरव चौहान (२० लाख), स्वप्नील सिंग, (२० लाख) टॉम करन १.५० कोटी, लॉकी फर्ग्युसन (२ कोटी) अल्झारी जोसेफ (११.५० कोटी) आणि यश दयाल (५ कोटी) या खेळाडूंचा समावेश आहे.

अनिल कुंबळेंच्या मते, हा लिलाव आरसीबीसाठी चांगला गेला नाही आणि ते आपला संघ मजबूत करू शकले नाहीत. जिओ सिनेमावरील संवादादरम्यान तो म्हणाला, “मला वाटत नाही की आरसीबीच्या लिलावाच्या रणनीतीला सातपेक्षा जास्त गुण मिळतील. कारण जेव्हा तुम्ही लिलावात जाता, तेव्हा तुम्ही प्रसिद्ध झालेल्या खेळाडूंपेक्षा चांगले खेळाडू शोधण्याचा प्रयत्न करता. त्याने हेझलवूड, हसरंगा आणि हर्षल पटेल या तीन गोलंदाजांना सोडले. त्यांना त्याच्यापेक्षा चांगले गोलंदाज सापडतील का?”

हेही वाचा – IPL 2024 : गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदासाठी शुबमन गिल किती योग्य आहे? आशिष नेहराने उघडपणे सांगितले

अनिल कुंबळे पुढे म्हणाले, “संघाला अजूनही फिरकी गोलंदाजाची गरज आहे. चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर फिरकीपटू नेहमीच चांगली कामगिरी करतात. पण आता आरसीबीकडे असा कोणी फिरकीपटू नाही. त्यामुळे आता त्यांना गेल्या मोसमात जेमतेम खेळलेल्या कर्ण शर्मावर अवलंबून राहावे लागेल. तो त्यांचा प्रभावशाली गोलंदाज होता पण सर्व सामने खेळला नाही. फिरकीपटूशिवाय त्यांच्यासाठी हे सोपे असणार नाही.”
आयपीएल लिलावापूर्वी आरसीबीने मुंबई इंडियन्सशी ट्रेड करुन कॅमेरून ग्रीनला संघात सामील केले. जर आपण ग्रीनबद्दल बोलायचे, तर तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करतो. मात्र, आरसीबीमध्ये त्याची कामगिरी कशी होते हे पाहायचे आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kumble questions on rcbs strategy used in ipl 2024 auction vbm