भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी, विश्वचषकासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी धोनीच योग्य पर्याय असल्याचं म्हटलं आहे. विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना, भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमाचं कोडं अजुन सुटलेलं नाहीये. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार यासाठी भारताने गेल्या वर्षभरात विविध प्रयोग करुन पाहिले, मात्र यातून हाती काहीच लागलं नाही. मात्र अनिल कुंबळेच्या मते चौथ्या क्रमांकासाठी धोनीशिवाय भारताकडे कोणताही पर्याय नाहीये.
“भारताचे पहिल्या ३ क्रमांकाचे फलंदाज गेल्या वर्षभरात सतत चांगली कामगिरी करत आहेत. भारतीय संघाच्या यशाचं हेच महत्वाचं कारण आहे. वन-डे सामन्यात तुमचा संघ यशस्वी व्हायचा असेल तर पहिल्या ३ फलंदाजांनी चांगला खेळ करणं आवश्यकच असतं. माझ्या मते चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी धोनी हाच योग्य पर्याय आहे. ५, ६ आणि ७ या क्रमांकावर फलंदाजी कोण करेल यासाठी तुम्हाला विचार करावा लागेल. माझ्यामते भारतीय संघाने याच जागांसाठी गरेजपेक्षा जास्त प्रयोग केले आहेत. याच कारणामुळे संघाचा समतोल काहीसा बिघडलेला आहे.” CricketNext या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत कुंबळे बोलत होता.
२०१७ साली इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पहिले ३ फलंदाज अपयशी ठरल्याचा फटका भारताला बसलेला आहे. पाकिस्तानने भारतावर मात करुन चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं. याच घटनेचा आधार घेऊन कुंबळे म्हणाला, “उपांत्य किंवा अंतिम फेरीत समजा तुमचे पहिले ३ फलंदाज चालले नाहीत तर?? अशावेळी तुम्हाला पर्यायी फलंदाजांची गरज असते, आणि याच ठिकाणी भारतीय संघ मागे पडलाय. मधल्या फळीतल्या फलंदाजांना योग्य त्या संधी दिल्या गेल्या नाहीत. गरजेपेक्षा मधल्या फळीतल्या फलंदाजांवर अनेक प्रयोग झाले. याच कारणासाठी फलंदाजीमध्ये तुमचे सुरुवातीचे ४ फलंदाज मजबूत आणि तंत्रशुद्ध असावे लागतात. याचसाठी धोनी चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय ठरतो.”
अवश्य वाचा – चेतेश्वर पुजाराला वन-डेत चौथ्या क्रमांकावर संधी द्या, सौरव गांगुलीचा अजब सल्ला
३० मार्चपासून इंग्लंडमध्ये विश्वचषकाला सुरुवात होते आहे. विराट कोहलीने, विश्वचषकासाठी भारतीय संघ जवळपास निश्चीत झाला असून एका जागेसाठी विचार सुरु असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोणता खेळाडू येणार आणि कोणत्या खेळाडूला विश्वचषकाचं तिकीट मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा – विराट कोहली वन-डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळाडू बनण्याच्या वाटेवर – शेन वॉर्न