भारतीय क्रिकेट संघाची निवड समिती गेल्या काही दिवसांत चांगल्या गोष्टींसाठी चर्चेत येत नाहीये. एम.एस.के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघावरुन अनेकदा टीकेचं धनी व्हायला लागलं होतं. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने या समस्येवर एक उपाय सुचवला आहे. भारताचा माजी कर्णधार आणि फिरकीपटू अनिल कुंबळे निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं विरेंद्र सेहवागने म्हटलं आहे. The Selector या अॅपच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान सेहवाग पत्रकारांशी बोलत होता.
“माझ्या मते अनिल कुंबळे निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार आहे. कुंबळे नेहमी सचिन, सौरव गांगुली आणि द्रविड यासारख्या दिग्गज खेळाडूंशी चर्चा करत असतो. तरुण खेळाडूंनाही त्याने चांगलं मार्गदर्शन केलं आहे. २००७-०८ सालात मी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संघात पुनरागमन केलं होतं, त्यावेळी अनिल कुंबळेने माझ्या रुमवर येऊन, पुढील दोन मालिकांपर्यंत तूला संघातून काढलं जाणार नाही अस सांगितलं. खेळाडूला अशाच प्रकारच्या आत्मविश्वासाची गरज असते.” सेहवाग पत्रकारांशी बोलत होता.
अनिल कुंबळेने याआधी एक वर्षभर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं आहे. मात्र निवड समितीचा अध्यक्ष म्हणून तो काम पाहिल याची मला खात्री नाही. बीसीसीआयने या पदासाठीचं मानधन वाढवावं, अनेक माजी खेळाडू या पदासाठी उत्सुक आहेत, सेहवागने आपलं मत मांडलं. सध्या बीसीसीआयच्या निवड समिती प्रमुखांना १ कोटी रुपये वार्षिक मानधन मिळतं. सध्याच्या निवड समितीचे प्रमुथ एम.एस.के. प्रसाद य़ांनी केवळ १३ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.