अंकित बावणे याने केलेल्या झुंजार शतकामुळेच महाराष्ट्राला सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ५१९ धावांचा डोंगर उभारता आला. उर्वरित खेळात सौराष्ट्राची पहिल्या डावात ३ बाद ९४ अशी स्थिती झाली.
 महाराष्ट्राने ६ बाद ३२० धावसंख्येवर पहिला डाव पुढे सुरू केला. त्या वेळी ते पाचशे धावांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता कमी वाटत होती. तथापि या मोसमात अनेक वेळा शानदार खेळ करणाऱ्या बावणे याने शैलीदार शतक टोलविले. त्याने श्रीकांत मुंढे (३७) व चिराग खुराणा (६९) यांच्या साथीत अर्धशतकी भागीदारी रचल्या. त्यामुळेच महाराष्ट्रास आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.
सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीत बावणे याने पुन्हा एकदा संघास सावरले. त्याने मुंढे याच्या साथीत सातव्या विकेटसाठी ७९ धावांची भर घातली. मुंढे याने तीन चौकार व एक षटकारासह ३७ धावा केल्या. मुंढेच्या जागी आलेल्या खुराणा यानेही दमदार खेळ करीत बावणेला साथ दिली. त्यांनी आठव्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. बावणे याने ३१२ मिनिटांच्या खेळात अकरा चौकार व एक षटकारासह १२४ धावा केल्या. खुराणा याने पाच चौकारांसह ६९ धावा केल्या. सौराष्ट्रकडून कमलेश मकवाना याने पाच विकेट्स घेतल्या.
सौराष्ट्राच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. भूषण चौहान (४) व सागर जोगियानी (४) ही सलामीची जोडी तंबूत परतली त्या वेळी त्यांच्या अवघ्या नऊ धावा झाल्या होत्या. शेल्डॉन जॅक्सन याने आक्रमक खेळ करीत अर्पित वासवदा (१४) याच्या साथीत ५८ धावांची भर घातली. जॅक्सन याने पाच चौकार व चार षटकारांसह नाबाद ५७ धावा केल्या. खेळ संपला त्या वेळी विशाल जोशी (नाबाद ९) हा त्याच्या साथीत खेळत होता.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र पहिला डाव-१५०.५ षटकांत ६ बाद ३२० (स्वप्नील गुगळे ११, हर्षद खडीवाले ६७, रोहित मोटवानी ७०, केदार जाधव ४९, अंकित बावणे १२४, राहुल त्रिपाठी १४, संग्राम अतितकर ३९, श्रीकांत मुंढे ३७, चिराग खुराणा ६९, अक्षय दरेकर १७, समाद फल्लाह नाबाद ०, कमलेश मकवाना ५/१२०, धर्मेद्रसिंह जडेजा २/१८९).
सौराष्ट्र पहिला डाव २९ षटकांत ३ बाद ९४ (शेल्डॉन जॅक्सन खेळत आहे ५८, समाद फल्लाह १/१६, श्रीकांत मुंढे १/५, अक्षय दरेकर १/२६).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा