आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच भाग घेण्याची संधी मला मिळाली आहे, मात्र कोणतेही दडपण न घेता त्यामध्ये चांगले यश मिळविण्यासाठी माझा प्रयत्न राहील, असे भारताची अग्रक्रमांकाची टेनिसपटू अंकिता रैना हिने सांगितले.
बृहन्महाराष्ट्र कॉमर्स महाविद्यालयाची (बीएमसीसी) विद्यार्थिनी अंकिता हिने जागतिक महिलांच्या क्रमवारीत एका वर्षांत ३७७व्या स्थानावरून २७७व्या स्थानावर झेप घेतली आहे. दक्षिण कोरियात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ती एकेरी व दुहेरी या दोन्ही विभागात खेळणार आहे. प्रथमच या स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे तेथे चमक दाखविण्यासाठी ती उत्सुक झाली आहे. ‘‘आशियाई स्पर्धेपूर्वी उझबेकिस्तानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मी खेळणार आहे. तेथील अनुभव मला आशियाई स्पर्धेसाठी निश्चित होणार आहे. आशियाई स्पर्धेत माझ्यापुढे चीन, कोरिया व जपानच्या खेळाडूंचे प्रामुख्याने आव्हान असणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी मी मानसिक तयारी केली आहे. जागतिक स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये या देशांबरोबरच युरोपियन खेळाडूंबरोबरही मी सामने खेळले आहेत. त्यामुळे त्यांच्या गुणदोषांबाबत मी सखोल अभ्यास केला आहे,’’ असे अंकिताने सांगितले. अंकिता ही मूळची अहमदाबादची खेळाडू असून ती गेली पाच वर्षे पीवायसी जिमखाना येथे हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. गतवर्षी तिने तीन आयटीएफ स्पर्धा जिंकल्या आहेत.
‘‘गतवर्षीच्या तुलनेत माझ्या सव्‍‌र्हिस अधिक वेगवान होऊ लागल्या आहेत. तसेच परतीचे फटके, लॉब्ज व प्लेसिंग या तंत्रातही मी सुधारणा केली आहे. परदेशात जेवढय़ा अधिकाधिक स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी मला मिळेल, तेवढी माझ्या कामगिरीत प्रगती होणार आहे. आगामी आठ महिन्यांमध्ये पहिल्या दीडशे क्रमांकांमध्ये स्थान मिळविण्याचे माझे ध्येय आहे. त्यामुळेच परदेशात मी एकेरीबरोबरच दुहेरीच्या सामन्यांमध्येही भाग घेत आहे. दुहेरीत आपल्या सहकाऱ्याकडून बरेच काही शिकता येते. रश्मी चक्रवर्ती या ज्येष्ठ खेळाडूसमवेत मी तीन-चार स्पर्धामध्ये अव्वल यश मिळविले आहे. तिच्याकडून मला खूप बहुमोल मार्गदर्शन मिळाले आहे,’’ असे अंकिता यावेळी म्हणाली.

Story img Loader