यंदाच्या मोसमात दुहेरीच्या दोन जेतेपदांना गवसणी
टेनिसच्या महिला एकेरीत एकमेकांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या अंकिता रैना आणि कारमान कौर ठंडी यांची जोडी दुहेरीत मात्र एकमेकांना पूरक ठरत आहे. अंकिताची परिपक्वता आणि कारमानचे निरीक्षण, कौशल्य यांचा मेळ जुळून आल्याने या जोडीने यंदाच्या वर्षी दुहेरीत सलग दोन स्पर्धाची विजेतेपदे पटकावली आहेत.
देशातील महिला एकेरीमध्ये प्रथम आणि द्वितीय स्थानी असलेल्या या दोघींनी यंदाच्या वर्षी तैपेईत आणि त्यानंतर पुणे खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये बाजी मारून दोन चषकांवर नाव कोरले. दुहेरीतील ही भागीदारी किती काळ लांबवायची किंवा अजून कोणत्या स्पर्धामध्ये एकत्रित खेळायचे, याबाबत त्यांनी फारसा विचार केलेला नाही. मात्र जर त्या दोघीही एकाच स्पर्धेत खेळणार असतील, तर दुहेरीत एकमेकांच्या साथीनेच उतरायचे, असे धोरण त्यांनी निश्चित केले आहे.
या अनुभवाबाबत अंकिताने सांगितले की, ‘‘तैपेईत खेळतानाच आमच्यातील समन्वय अपेक्षेपेक्षा खूप पटकन जुळून आल्याचे आमच्या लक्षात आले. विशेषत्वे जेव्हा एखादा गुण आम्ही गमावला तर त्यानंतरचा आपापसातील संवाद अधिक प्रभावीपणे व्हायचा. एखादा दिवस दुसऱ्या खेळाडूचा नसतो, त्या वेळी सहकाऱ्याने अधिकची जबाबदारी पेलायची असते. हे आमच्यात अगदी सहजपणे घडत गेल्याने आम्ही भविष्याबाबत आशादायी आहोत.’’
कारमानने त्यांच्या दुहेरीतील अनुभवांचे किस्से सांगितले. ती म्हणाली, ‘‘एखाद्यावेळी मी अत्यंत सहजपणे मारता येणाऱ्या फटक्यावर हुकले किंवा योग्य जागी मारला नाही. तरी एकमेकांवर न चिडता सकारात्मकपणे पुढील खेळ खेळायचा, असे धोरण आम्ही ठेवले. त्याचा फायदा आम्हाला तैपेईतील स्पर्धेत सुपर टाय ब्रेकरमध्ये झाला. त्यामुळेच आम्ही ती स्पर्धा जिंकण्यात यशस्वी ठरलो. सामन्यातील ताणतणाव अंकिता अत्यंत परिपक्वपणे हाताळून मला सकारात्मक राखण्यास मदत करते. तसेच एकमेकांमधील समन्वय ही आमची ताकद असून त्याचाच चांगला परिणाम दिसून येत आहे.’’