मानाच्या ‘४१व्या महाराष्ट्र केसरी’ या किताबासाठी रविवारी पुण्याचा सचिन येलबर व जळगावचा विजय चौधरी या दोन मल्लांत लढत होणार आहे. रविवारी सायंकाळी मॅटवरील आखाडय़ात यंदाच्या चांदीच्या गदेचा विजेता कोण, याचा फैसला होईल.
सचिन मॅटवरील लढतीत विजेता ठरला तर विजय मातीवरील लढतीत. सचिन मूळचा मोटेवाडीचा (ता. शिरूर). लोणीकंदच्या ‘जाणता राजा’ कुस्ती केंद्रात तो संदीप मोंढवे व मंगलदास बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. यापूर्वीच्या किताबाच्या लढतीत तो दोन वेळा कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. काही राष्ट्रीय स्पर्धातूनही त्याने चमक दाखवली होती.
विजय सध्या पंजाबमधील घुमछडी येथे रोहित पटंल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. पुण्यातील मामासाहेब मोहळ कुस्ती केंद्रातही त्याने रुस्तुम-ए-हिंदू अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला आहे. तो मूळचा चाळीसगावचा (जिल्हा जळगाव). त्याचे वडील नथुराम शेती करतात व पहेलवानही आहेत. कोपरगावच्या जंगली महाराज आश्रमाच्या व्यायामशाळेत त्याने प्रशिक्षणास सुरुवात केली होती.
दोघांनी मानाची गदा आपणचजिंकू, असा आत्मविश्वास व्यक्त केला. सचिनला आपले वडील गेनूभाऊ यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, तर विजयला आपले अधुरे स्वप्न पूर्ण करायचे आहे. गोंदिया येथे नरसिंग यादवविरुद्ध लढताना पायाला दुखापत झाल्याने त्याला उपमहाराष्ट्र केसरी पदावर समाधान मानावे लागले होते. यंदा त्याची पुन्हा नरसिंगविरुद्ध लढण्याची इच्छा होती, परंतु नरसिंग लढतीत सहभागी नसल्याची खंत त्याला आहे.
मॅटवरील लढतीत सचिनने महेशवर ४-१ गुणांनी मात करीत अंतिम लढतीत प्रवेश केला. सचिनने सुरुवातीला पट काढत मध्यंतरापर्यंत १-० अशी आघाडी घेतली होती. नंतर दुहेरी पटावर २ गुण मिळवीत शेवटपर्यंत गुणांची आघाडी कायम ठेवली. मातीवरील लढतीत विजयने नगरच्या योगेशवर ७-५ गुणांनी मात केली, ही लढत शेवटपर्यंत अटीतटीची झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा