Pakistan Cricket Board: गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान क्रिकेट संघात सातत्याने मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आता आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेत पीसीबीने मोहम्मद रिझवानला टी-२० फॉरमॅटसाठी उपकर्णधार म्हणून घोषित केले आहे. मंडळाने सोमवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली. सर्व फॉरमॅटमध्ये सातत्याने घसरलेल्या कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद बदलल्यानंतर मोहम्मद रिझवानला आता न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टी-२०चा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अलीकडेच, पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे, जी आगामी विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे.
पाकिस्तानचा संघ १२ ते २१ जानेवारी दरम्यान न्यूझीलंड दौऱ्यावर असेल. येथे दोघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. छोट्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तान संघाची कमान शाहीन आफ्रिदीकडे आहे, तर अनुभवी रिझवानकडे संघाचे उपकर्णधार असेल. दरम्यान हा निर्णय अचानक घेण्यात आल्याने क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शाहीनच्या नेतृत्वाखाली संघ ऑकलंडला पोहोचला
वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली संघ आगामी दौऱ्यासाठी ऑकलंडला पोहोचला आहे. पाकिस्तानने नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा पूर्ण केला आहे. या काळात संघाला कसोटी मालिकेत ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याच वेळी, आता टी-२० संघाचे सदस्य सिडनीहून थेट न्यूझीलंडला पोहोचले आहेत.
गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानची कामगिरी फारशी प्रभावशाली नाही. आशिया चषकानंतर एकदिवसीय विश्वचषक आणि त्यानंतर कसोटी मालिका गमावल्यामुळेही संघाला टीकेला सामोरे जावे लागले आहे. मात्र, दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तिन्ही फॉरमॅटच्या संघात बरेच बदल केले आहेत, ज्यामध्ये बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवणे महत्त्वाचे होते. आता शाहीन आफ्रिदीचा टी-२० कर्णधार म्हणून हा पहिलाच दौरा असेल.
सिडनी कसोटीतून आफ्रिदीला विश्रांती देण्यात आल्याने त्याचा, १२ जानेवारीपासून न्यूझीलंडमध्ये सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानचा कर्णधार बनण्याशी कोणताही संबंध नाही, यावरही माजी अष्टपैलू खेळाडूने भर दिला. मोहम्मद हाफिज म्हणाला, “शाहीनला टी-२० क्रिकेट खेळायचे होते म्हणून आराम दिला नाही. त्याच्या शरीरातील काही भागात वेदना होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला फारसे बरे वाटत नव्हते. त्याचे शरीर योग्य प्रतिसाद देऊ शकेल म्हणून एक संघ संचालक या अधिकाराने कोणताही खेळाडूला अधिक दुखापत होणार नाही ना, याची खबरदारी मी घेतली. तो सिडनी कसोटीत आणखी दुखापतग्रस्त होऊ नये यासाठी मी हा निर्णय घेतला.”
गरज पडल्यास महत्त्वाचा फलंदाज बाबर आझमलाही विश्रांती दिली जाऊ शकते, असेही हाफिजने सूचित केले. तो म्हणाला, “आम्हाला बाबरच्या कामगिरीवर पूर्ण विश्वास आहे. जरी तो वाईट टप्प्यातून जात असला तरी पण गरज पडल्यास त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र, आम्ही त्याच्याशी बोलून त्याला काय हवे आहे ते जाणून घेऊ.” यावर आता पाकिस्तानचे संघ व्यवस्थापन काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.