किमयागार लिओनेल मेस्सीच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर बार्सिलोनाने ला लिगा स्पर्धेत डिर्पोटिव्हो ला कोरूनावर ४-० असा दणदणीत विजय मिळवला. या विजयासह बार्सिलोनाने गुणतालिकेत पिछाडी भरून काढली असून आता ते रिअल माद्रिदच्या केवळ एक गुण मागे आहेत.
मेस्सीचा गोलचा पहिला प्रयत्न कोरूनाच्या फॅब्रिसिओनो रोखला. मात्र त्यानंतर लगेचच मेस्सीने रॅकिटिकच्या क्रॉसवर सुरेख गोल करत फॅब्रिसिओला चकवले. मेस्सी अफलातून फॉर्ममध्ये असताना ल्युइस सुआरेझ मात्र चाचपडत होता. ३३व्या मिनिटाला मेस्सीने नेयमारच्या पासचा उपयोग सुंदरपणे उपयोग करत आणखी एक गोल केला. बार्सिलोनासाठी ३०वी हॅट्ट्रिक नोंदवताना मेस्सीने डाव्या पायाने गोल करत बार्सिलोनाला भक्कम आघाडी मिळवून दिली. डिर्पोटिव्होच्या सिडनेईने स्वयंगोल केल्याने बार्सिलोनाला फायदाच झाला. उर्वरित वेळेत कोणताही प्रतिकार न झाल्याने बार्सिलोनाने सहज विजय मिळवला.
‘‘मेस्सीचा सध्याचा फॉर्म आश्चर्यकारक आहे. बार्सिलोनाच्या संघात दोन गटांमध्ये उद्भवलेल्या कथित वादाच्या अफवांना बाजूला सारत मेस्सीने शानदार प्रदर्शन करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे,’’ असे बार्सिलोनाचे व्यवस्थापक ल्युइस एनरिक यांनी सांगितले.
दरम्यान अन्य लढतींमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर रिअल माद्रिदने गेटाफेचा ३-० असा धुव्वा उडवला. वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठीच्या प्रतिष्ठेच्या ‘बलून डि ऑर’ पुरस्काराने सन्मानित रोनाल्डोने दोन गोल करत या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
 अ‍ॅटलेटिको माद्रिदने कोपा डेल रे चषकात रिअल माद्रिदवर मात केली होती. तोच फॉर्म कायम राखत त्यांनी  ग्रॅनडावर २-० असा विजय मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another lionel messi hat trick against deportivo in la liga