* मुंबई इंडियन्सचा पुणे वॉरियर्सवर ४१ धावांनी दणदणीत विजय
* सामनावीर रोहित शर्माचे दणकेबाज अर्धशतक
* मिचेल जॉन्सनचे ३३ धावांत ३ बळी
मुंबई इंडियन्सने अपेक्षेप्रमाणेच वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावर दुबळ्या पुणे वॉरियर्सला सहजगत्या हरवले आणि आयपीएल गुणतालिकेतील आपली घोडदौड कायम राखली. सलग दुसऱ्या सामन्यात वानखेडेवर रोहित शर्माची घणाघाती फटकेबाजी पाहण्याचे भाग्य मुंबईकरांना लाभले. त्यामुळेच मुंबई इंडियन्सला आपला तिसरा विजय ४१ धावांनी रुबाबात नोंदवता आला. दोन दिवसांपूर्वी पुणे वॉरियर्सने आपली ११ पराभवांची मालिका खंडित करताना राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय नोंदवत आपले खाते उघडले होते; परंतु पहिले पाढे पंचावन्न हा कित्ता गिरवणाऱ्या पुण्याच्या खात्यावर तिसरा पराभव जमा झाला.
पुण्याचा सलामीवीर आरोन फिन्चला मिचेल जॉन्सनने पहिल्याच चेंडूवर बाद करीत पहिला धक्का दिला. त्यानंतर पुण्याचा संघ अखेपर्यंत सावरूच शकला नाही. युवराज सिंग, टी. सुमन, अँजेलो मॅथ्यूज आणि मिचेल मार्श यांनी पुण्याचा पराजय टाळण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले; परंतु मुंबईच्या गोलंदाजांपुढे त्यांचे काहीच चालले नाही. मार्शने २ चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधिक ३८ धावा केल्या, तर मिचेल जॉन्सनने ३३ धावांत ३ बळी घेत आपली छाप पाडली.
तत्पूर्वी, रोहित शर्माने सलग दुसऱ्या सामन्यात साकारलेल्या अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १८३ अशी दमदार धावसंख्या उभारली. मागील दोन सामन्यांत चांगली सलामी नोंदवण्यात अपयशी ठरलेल्या कप्तान रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकरने ५४ धावांची भागीदारी करत आपला इरादा स्पष्ट केला. वानखेडेवर मोठय़ा संख्येने हजेरी लावणाऱ्या बालदोस्तांना सचिनने निराश केले नाही. २९ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावांची त्याने लाजवाब खेळी उभारली. दोन्ही दिग्गज फलंदाज माघारी परतल्यानंतर सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा छोटय़ा चणीचा दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा यांनी मागील सामन्याप्रमाणेच जोडी जमवली. या जोडीने ५५ धावांची भागीदारी रचली. दुर्दैवाने कार्तिकला (४१) अर्धशतक पूर्ण करता आले नाही, पण रोहितने पुणे वॉरियर्सच्या गोलंदाजांची अजिबात गय केली नाही. अशोक दिंडाच्या अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर लाँग ऑफला षटकार खेचून रोहितने आपले अर्धशतक साजरे केले. त्यानंतर त्याने मिडविकेटला आणखी एक उत्तुंग षटकार मारला. त्याने ३२ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.
आयपीएलच्या मागील हंगामात वानखेडे स्टेडियमवर पुणे वॉरियर्सने मुंबईला पराभूत करण्याची किमया साधली होती. त्या सामन्यात ४ बळी घेणारा अशोक दिंडा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता, पण या खेपेस मुंबईच्या फलंदाजांनी प्रामुख्याने दिंडावरच हल्ला चढवला. त्याच्या ४ षटकांत मुंबईच्या फलंदाजांनी तब्बल ६३ धावा कुटल्या.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ३ बाद १८३ (सचिन तेंडुलकर ४४, दिनेश कार्तिक ४१, रोहित शर्मा नाबाद ६२, किरॉन पोलार्ड नाबाद १९; आरोन फिन्च १/११, युवराज सिंग १/१३) विजयी वि. पुणे वॉरियर्स : २० षटकांत ८ बाद १४२ (युवराज सिंग २४, टी. सुमन २३, अँजेलो मॅथ्यूज १९, मिचेल मार्श ३८; मिचेल जॉन्सन ३/३३)
सामनावीर : रोहित शर्मा.
वानखेडेवरून..
वानखेडेवर निळा बालजल्लोष!
वानखेडे स्टेडियमवर शनिवारी सुमारे दहा हजार बाल क्रिकेटरसिकांची उपस्थिती सहज लक्ष वेधून घेत होती. निळ्या कपडय़ांमधील ही मुले सचिन तेंडुलकरसहित अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा खेळ स्टेडियमवर ‘याचि डोळा’ पाहायला मिळणार म्हणून हरखून गेली होती. दुपारच्या भर उन्हातही त्यांचा उत्साह आणि आवेश वातावरण भारून टाकत होता. मुंबई इंडियन्सच्या ‘सर्वासाठी शिक्षण’ या प्रकल्पांतर्गत या मुलांना हा सामना पाहण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्स गेली तीन वष्रे हा प्रकल्प राबवत आहे. गरीब शाळकरी मुलांच्या सन्मानार्थ मालकीण नीता अंबानी यांच्या पुढाकाराने मुंबई इंडियन्सचा संघ पुणे वॉरियर्सविरुद्धचा हा सामना खेळला. सचिनने प्रारंभीपासून केलेल्या फटकेबाजीला ही मुले मनसोक्त दाद देत होती.
छोटय़ा दोस्तांसाठी विदूषकांचे पथक
चौकार असो वा षटकार किंवा फलंदाज तंबूत परततो, हा प्रत्येक क्षण आयपीएलच्या व्यासपीठावर चीअरगर्ल्स आपल्या नृत्याविष्कार आणि अदांनी साजरे करतात. शनिवारी पुणे वॉरियर्सविरुद्धच्या सामन्याला दहा हजार शाळकरी मुलांनी आवर्जून हजेरी लावली. त्यामुळे चीअरगर्ल्सना टाळून मुंबई इंडियन्सने या मुलांच्या मनोरंजनासाठी चक्क विदूषकांना पाचारण केले होते. मुंबई इंडियन्सच्या दोन छोटेखानी स्टेजवर या विदूषकांच्या पथकांनी संघाच्या महत्त्वाच्या क्षणांना छोटय़ा दोस्तांची मनसोक्त करमणूक केली.
जोडी जमली रे..
सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग क्रिकेटच्या दुनियेतील दोघेही दिग्गज फलंदाज. चाळिशीकडे झुकू लागलेल्या या दोन्ही फलंदाजांनी मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दमदार सलामी नोंदवून दिली होती. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध अनुक्रमे ३ आणि ० धावांची सलामी तेंडुलकर-पाँटिंग जोडीला नोंदवता आली होती. या पाश्र्वभूमीवर मुंबई इंडियन्सने सलामीच्या जोडीत बदल करावेत, अशी मागणी जोर धरत होती; परंतु वानखेडेवर अखेर ही जोडी जमली आणि ५४ धावांची दमदार सलामीही नोंदवली गेली. पाँटिंगने १४ तर सचिनने ४४ वैयक्तिक धावा काढल्या.
– के. प्रशांत
रोहितचा जबाब, मुंबईचा रुबाब!
मुंबई इंडियन्सने अपेक्षेप्रमाणेच वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावर दुबळ्या पुणे वॉरियर्सला सहजगत्या हरवले आणि आयपीएल गुणतालिकेतील आपली घोडदौड कायम राखली. सलग दुसऱ्या सामन्यात वानखेडेवर रोहित शर्माची घणाघाती फटकेबाजी पाहण्याचे भाग्य मुंबईकरांना लाभले.
First published on: 14-04-2013 at 01:30 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Answer of rohit grace of mumbai