Anuj Rawat join Gujarat Titans Camp : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात यष्टिरक्षक फलंदाज अनुज रावतला गुजरात टायटन्स संघाने ३० लाख रुपयांना विकत घेतले. यापूर्वी तो आरसीबी संघाचा सदस्य होता. आयपीएल २०२५ सुरू व्हायला अजून बराच वेळ आहे. मात्र याआधीच अनुज रावतने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या राज्य संघाच्या रणजी शिबिरातून बाहेर पडला आहे. तो सोमवारी सुरतमध्ये आपला आयपीएल संघ गुजरात टायटन्सच्या सराव सत्रात सामील झाला. त्याचा हा निर्णय त्याला महागात पडू शकतो. कारण रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यात दिल्लीचा सौराष्ट्रशी सामना होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुज रावत गुजरात टायटन्सच्या कॅम्पमध्ये सामील –

मागील काही कालावधीपासून बीसीसीआयचे अधिकारी खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेला प्राधान्य देण्यास सांगत आहेत. अशात रणजी हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याच्या आठवडाभर अगोदर आयपीएलच्या शिबिरात रावत यांचा सहभाग हे त्याचे प्राधान्य कशाला आहे, याचे स्पष्ट संकेत देणारे आहे. जे त्याला श्रेयस अय्यर आणि इशान किशनप्रमाणे महागात पडू शकते. गुजरात टायटन्सने आयपीएल २०२५ ची तयारी सूरतमध्ये प्रशिक्षण शिबिरासह सुरू केली आहे. या शिबिरात अनुज रावत, इशांत शर्मा, जयंत यादव, कुमार कुशाग्र, महिपाल लोमरोर आणि अर्शद खान या खेळाडूंसह प्रशिक्षक आणि क्रीडा कर्मचारी सहभागी झाले आहेत.

अनुज रावतने राज्य क्रिकेट बोर्डाला दिली नाही माहिती –

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) च्या राज्य संघ निवड समितीचे निमंत्रक सचिव अशोक शर्मा यांना रावतबद्दल विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाला की, अनुजने आयपीएल संघाच्या शिबिरात सहभागी होण्यासाठी येथे सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी शिबिरातून बाहेर पडल्याची माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. त्यासाठी त्याने राज्य क्रिकेट बोर्डाची परवानगी घ्यायला हवी होती. आमचे दोन रणजी सामने बाकी असून कोटलामध्ये शिबिर सुरू आहे. त्याला रणजी ट्रॉफी शिबिरात भाग न घेण्याची परवानगी कोणी दिली, हे मला माहीत नाही.

हेही वाचा – SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज

श्रेयस-इशानला केंद्रीय करार गमवावा लागला होता –

अनुज रावतच्याआधी, गेल्या वर्षी केकेआरचा आयपीएल विजेता कर्णधार श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी स्थानिक क्रिकेटपेक्षा आयपीएलला अधिक महत्त्व दिले होते. ज्यामुळे या दोघांनाही बीसीसीआयचा केंद्रीय करार गमवावा लागला होता. अय्यर आणि किशन त्यांच्या चुकीपासून शिकले आणि सध्याच्या हंगामात सर्व फॉरमॅटमध्ये अनुक्रमे मुंबई आणि झारखंडकडून खेळत आहेत. अनुज रावतने आतापर्यंत ३४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १४३५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ३२ लिस्ट-ए सामन्यांमध्ये ८८८ धावा आहेत. याशिवाय त्याने आयपीएलच्या २४ सामन्यांमध्ये ३१८ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर एक अर्धशतक आहे

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anuj rawat leave delhi team and join gujarat titans camp ahead ipl 2025 season vbm