शेवटची तीन मिनिटे बाकी असताना अनुप कुमारने दोन गडी बाद करीत दिल्ली दबंगवर लोण चढवण्याचेही दोन गुणही वसूल केले. त्यामुळेच यू मुंबाचे प्रो कबड्डी लीगमधील अपराजित्व कायम राहिले. त्यांनी हा सामना २७-२२ असा रोमहर्षक लढतीनंतरजिंकला.
शेवटपर्यंत चुरशीने झालेल्या सामन्यात दिल्ली संघाने पूर्वार्धात १४-११ अशी आघाडी घेतली होती. त्यांच्याकडे सुरुवातीला चार गुणांची आघाडी होती. मात्र मुंबा संघाच्या भूपिंदर सिंगने सुपररेड करीत तीन गुण मिळविले व ९-९ अशी बरोबरी साधली. तथापि, दिल्लीने पुन्हा आघाडी घेतली. पूर्वार्धात अनुप कुमारला रोखण्यात दिल्ली संघाला यश मिळाले होते.
सामन्याच्या उत्तरार्धातही ३४व्या मिनिटांपर्यंत दिल्लीकडे २१-१९ अशी आघाडी होती. ३७ व्या मिनिटाला अनुप कुमार याची सुपर पकड करण्याच्या प्रयत्नात दिल्लीने दोन गडय़ांबरोबरच लोण स्वीकारला. या चढाईने मुंबा संघाला २४-२१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. ही आघाडी तोडण्यात दिल्ली संघ अपयशी ठरला. मुंबा संघाकडून अनुप कुमारबरोबरच मोहित चिल्लरही चमकला. दिल्ली संघाकडून रवींदर पहलने पकडीत नऊ गुणांची कमाई केली. त्यांचा भरवशाचा खेळाडू काशिलिंग आडकेला अपेक्षेइतके यश मिळाले नाही.
पाटण्याची पुण्यावर मात
पुणेरी पलटणचा कर्णधार वझीर सिंगची पकड करा व सामना जिंका, ही रणनीती पाटणा पायरेट्सने कल्पकतेने वापरली व हा सामना ३२-२८ असा जिंकला. सुरुवातीपासून उत्कृष्ट पकडी व खोलवर चढाया असा खेळ करीत पाटण्याने पूर्वार्धात २०-१३ अशी आघाडी घेतली होती. त्यांच्यासाठी हीच आघाडी निर्णायक ठरली. पुण्याचा भरवशाचा चढाईपटू वझीर हा सपशेल निष्प्रभ ठरला. त्याला अधिकाधिक वेळ बाहेर ठेवण्याच्या पाटण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले.
अनुप कुमारची निर्णायक चढाई
शेवटची तीन मिनिटे बाकी असताना अनुप कुमारने दोन गडी बाद करीत दिल्ली दबंगवर लोण चढवण्याचेही दोन गुणही वसूल केले.
First published on: 03-08-2015 at 04:26 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anup kumar decisive attack