भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा गुरुवारी सोशल मीडियावर चर्चेत आली होती. भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनीअर यांनी, सध्याच्या निवड समितीवर खरमरीत टीका केली. ते दिलीप वेंगसरकर यांच्या पुण्यातील क्रिकेट अकादमीला भेट देताना बोलत होते. यावेळी बोलत असताना इंजिनीअर यांनी सध्याच्या निवड समितीचं, अनुष्का शर्माला चहा देणं एवढच काम असल्याचं म्हणत एम.एस.के. प्रसाद आणि सहकाऱ्यांना लक्ष्य केलं.

अवश्य वाचा – अनुष्का शर्माला चहा देणं हेच यांचं काम, माजी भारतीय खेळाडूची निवड समितीवर खरमरीत टीका

फारुख इंजिनीअर यांनी केलेल्या या टीकेवर अनुष्का शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. ” मी ज्या-ज्या वेळी विराटसोबत सामना पहायला आले आहे त्यावेळी मी सामन्याच्या तिकीटासह सर्व खर्च स्वतः केला आहे. विश्वचषकादरम्यान मी वेगळ्या स्टँडमध्ये आणि निवड समिती वेगळ्या स्टँडमध्ये बसली होती. खोट्या बातम्या पसरवण्यासाठी माझ्या नावाचा वापर होतो आहे. जर तुम्हाला निवड समितीच्या पात्रतेवरती टीका करायची आहे तर जरुर करा. मात्र स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी माझं नाव वापरु नका.” अनुष्काने सोशल मीडियावर टाकलेल्या आपल्या स्पष्टीकरणात स्वतःची बाजू मांडली आहे.

दरम्यान, भारताच्या सध्याच्या निवड समितीपैकी एम.एस.के. प्रसाद यांनी ६ कसोटी आणि १७ वन-डे सामने खेळले आहेत. याव्यतिरीक्त देवांग गांधी (४ कसोटी, ३ वन-डे), शरणदीप सिंह (३ कसोटी, ५ वन-डे), जतिन परांजपे (४ वन-डे) आणि गगन खोडा (२ वन-डे) सामने खेळले आहेत. यावेळी बोलत असताना इंजिनीअर यांनी दिलीप वेंगसरकर यांच्यासारखी अनुभवी माणसं निवड समितीवर असणं गरजेचं असल्याचं म्हटलं. इंजिनीअर यांनी १९६१ ते १९७६ या काळात ४६ कसोटी आणि ५ वन-डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

Story img Loader