Anushka Sharma trolled after India’s defeat: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने विजेतेपदावर कब्जा केला. भारताच्या दुसऱ्या डावात विराट कोहली ४९ धावा करून बाद झाला. हा सामना पाहण्यासाठी कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही आली होती. टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडिया यूजर्स अनुष्काला ट्रोल करत आहे.
विराट कोहली डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या पाचव्या दिवशी (रविवारी) दुसऱ्या डावात ४९ धावा केल्यानंतर बाद झाला. त्याने ७८ चेंडूंचा सामना करत ७ चौकार मारले. कोहली बाद झाल्यानंतर अनुष्का दु:खी झाली दिसली. यानंतर तिचे अनेक फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत. पण तिचे फोटो शेअर करण्यासोबतच काही सोशल मीडिया यूजर्सनी तिला ट्रोलही केले आहे.
लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. अनुष्काबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही युजर्सचे मत आहे की, विराट अनुष्कामुळे लवकर बाद झाला. त्याचबरोबर काही लोकांचे म्हणने आहे की, तिच्यामुळे भारतीय संघाचा पराभव झाला. अनुष्काबाबत अशी वेगवेगळी मते सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने प्रत्युत्तरात आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित केला. यानंतर ऑस्ट्रेलियाने दोन्ही डावाच्या जोरावर भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात २३४ धावांवर गारद झाला. अशा प्रकारे भारताला २०९ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाच्या पराभवाला त्याची फलंदाजी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरली.