Anushka Sharma Special Post for Virat Kohli: विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा सिद्ध केले की त्याला मोठा खेळाडू का म्हणतात. चेस मास्टर म्हटलं जाणाऱ्या विराट कोहलीने मोठ्या हुशारीने फलंदाजी करत आपले शतक पूर्ण करत भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने भारताच्या विजयासह आपले शतक पूर्ण करत भारतीय चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला. त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मानेही टीम इंडियाच्या शानदार विजयावर आणि विराटच्या शतकावर आनंद व्यक्त केला.
रोहित शर्मा २० धावा करत बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला आणि थेट संघाला विजय मिळवून देत नाबाद माघारी परतला. विराटने शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरसह चांगली भागीदारी रचत पाकिस्तानला बॅकफूटवर ठेवलं. विराटने १११ चेंडूत ७ चौकारांसह १०० धावा केल्या. विराटने त्याच्या शतकी खेळीतील सर्वाधिक धावा या दुहेरी-एकेरी धावा घेत केल्या आहेत.
विराटच्या या शतकानंतर पत्नी अनुष्का शर्माने एक पोस्ट केली आहे. अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर विराट कोहलीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कॅमेऱ्याकडे पाहून थम्ब्स अप दाखलत आहे. अभिनेत्रीने फोटोच्या कॅप्शनमध्ये एक हार्ट इमोजी शेअर केला आहे, जो तिचे अव्यक्त प्रेम आणि आदर व्यक्त करत आहे. विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक झळकावून नवा विक्रम केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने ४३व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून आपल्या १०० धावा पूर्ण केल्या. विराट कोहलीपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा होता. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात त्याने ११९ चेंडूत ९१ धावा केल्या होत्या. याशिवाय पाकिस्तानविरूद्ध आशिया कप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.