लीग फेरीतील शेवटचा सामनाही अगदी लीलया जिंकत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी सज्ज झाली आहे. रविवारी नेदरलँड्सचा तब्बल १६० धावांनी पराभव केल्यानंतर आता भारतासमोर सेमीफायनलमध्ये पुन्हा एकदा न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियानं हा सलग ९वा विजय संपादित केला आहे. आत्तापर्यंतची विश्वचषकातील भारताची ही विक्रमी कामगिरी ठरली आहे. याचबरोबरच रविवारच्या सामन्यातील इतर काही गोष्टीही भारतीय चाहत्यांसाठी चर्चेच्या ठरल्या. त्यात विराट कोहलीची फिरकीवर गेलेली विकेट आणि त्यानंतरची अनुष्काची रिअॅक्शन याचाही समावेश आहे!
नेदरलँड्सला भारतानं विजयासाठी तब्बल ४११ धावांचं लक्ष्य दिलं होतं. अपेक्षेप्रमाणे नेदरलँड्सच्या संघाची फलंदाजी भारतीय गोलंदाजांसमोर निष्प्रभ ठरली व त्यांचा डाव २५० धावांवरच आटोपला. पण आपल्या गोलंदाजीमध्ये कर्णधार रोहित शर्मानं केलेले बदल चर्चेचा विषय ठरले. या सामन्यात भारतानं तब्बल ९ गोलंदाजांचा वापर केला.
९ भारतीय खेळाडूंनी केली गोलंदाजी!
खुद्द रोहित शर्मानं सामन्यात गोलंदाजी करत एक विकेटही घेतली. त्याचबरोबर विराट कोहलीनंही गोलंदाजी करताना तब्बल १० वर्षांनंतर एक विकेट घेतली. या दोघांप्रमाणेच शुबमन गिल व सूर्यकुमार यादवनंही गोलंदाजी केली. गोलंदाजीचे पर्याय चाचपून बघण्याची या सामन्यात संधी होती, तेच आम्ही केलं, अशी प्रतिक्रिया रोहित शर्मानं सामन्यानंतर दिली. यावेळी विराट कोहलीनं घेतलेल्या विकेटनंतर जशी अनुष्का शर्माची रिअॅक्शन व्हायरल झाली, तशीच ती त्याची स्वत:ची विकेट गेल्यानंतरही व्हायरल झाली.
विराट बाद, अनुष्काचा विश्वास बसेना!
विराट कोहली वैयक्तिक ५१ धावसंख्येवर असताना व्हॅन डे मार्वेच्या फिरकीवर बाद झाला. यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच विराट कोहली फिरकीसमोर बाद झाला. मात्र, तो बाद झाल्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेली त्याची पत्नी अनुष्काचा त्यावर विश्वासच बसला नाही. त्याचबरोबर विराट बाद झाल्यामुळे तिचाही भ्रमनिरास झाल्याचं तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराटनं घेतलेली विकेट, पुन्हा अनुष्का चर्चेत!
दरम्यान, आधी विराटची स्वत:ची विकेट गेल्यानंतर जसे अनुष्काचे हावभाव व्हायरल होत आहेत, तशीच जेव्हा विराटनं स्वत: विकेट घेतली, तेव्हाही अनुष्काचा त्यावर विश्वास बसला नाही. विराट कोहलीनं नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सची विकेट घेतल्यानंतर अनुष्का शर्मानं अगदी मनापासून हसत त्या विकेटवर आपलं आश्चर्य व्यक्त केलं. हा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे.
रविवारच्या सामन्यात भारताच्या पहिल्या पाचही फलंदाजांनी अर्धशतकाहून जास्त धावा केल्या आहेत. भारताच्या खात्यात फलंदाजांकडून अशी कामगिरी पहिल्यांदाच झाल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे.