Anushka Sharma Spotted Sleeping in IND vs AUS Match: चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आला होता. ४ मार्चला झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने दमदार विजय नोंदवत अंतिम फेरीत धडक मारली. भारताच्या या विजयात विराट कोहलीचा महत्त्वाचा वाटा होता, त्याने ८४ धावांची खेळी केली. यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. या सामन्यादरम्यानचा अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय संघाच्या या महत्त्वाच्या सामन्यात विराटला पाठिंबा देण्यासाठी त्याची पत्नी अनुष्का शर्माही स्टेडियममध्ये उपस्थित होती. आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती झोपलेली दिसत आहे. भारतीय संघ फलंदाजी करत असतानाचा हा व्हीडिओ आहे.

भारताच्या फलंदाजी दरम्यान, १५व्या षटकानंतर ब्रेक दरम्यान, कॅमेरामनने अनुष्का शर्मावर कॅमेरा झुम केला, तेव्हा ती झोपलेली दिसली. यावेळी कोहली २८ चेंडूत १८ धावा करून क्रीजवर होता. विराट कोहलीने या सामन्यात ८४ धावांची उत्कृष्ट खेळी केली. पण या खेळीत चेस मास्टर असलेल्या विराटने सर्वाधिक धावा या एकेरी धावा घेत केल्या. पॉवरप्लेमध्येच दोन विकेट्स गमावल्याने भारतीय संघ काहीसा दडपणाखाली होता. यानंतर भारताला सामन्यात कायम ठेवण्यासाठी विकेट्स राखण्याबरोबरच भागीदारीचीही गरज होती.

चाहत्यांनी अनुष्का शर्माच्या या व्हीडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. काही जणांनी म्हटलं की, बाळांच्या आई असंच झोपतात, तर एकाने लिहिलं की, टिपिकल इंडियन मॉम, अगदी भारतीय आईसारखी झोपलीय… अनुष्का आणि विराट दोन मुलांचे आई-बाबा आहेत.

अनुष्काचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट विजयानंतर तिच्यासमोर आनंद साजरा करताना दिसत आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजयानंतर स्टँन्ड्समध्ये बसलेल्या अनुष्कासमोर आक्रमक अंदाजात विजयाचा आनंद साजरा करताना दिसला. त्याला असं सेलिब्रेट करताना पाहून अनुष्का टाळ्या वाजवत त्याला प्रोत्साहन देताना दिसली.

दुबईत प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने भारतासमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने ५व्या षटकातच पहिली विकेट गमावली. त्यामुळे या सामन्यात कोहलीला लवकर फलंदाजीला यावे लागले. यानंतर अवघ्या दोन षटकांनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माही बाद झाला. यानंतर कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने डावाची धुरा सांभाळत ९१ धावांची भागीदारी केली. पण अय्यरही भारत १३४ धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर कोहलीने अक्षर पटेलह ४४ आणि केएल राहुलबरोबर ४७ धावांच्या दोन महत्त्वाच्या भागीदारी करून सामना भारताच्या दिशेने वळवला.

Story img Loader