सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत आहे. अलीकडेच, अनुष्का मुलगी वामिका आणि विराटसोबत दक्षिण आफ्रिकेला जात असताना विमानतळावर दिसून आली. यादरम्यान तिला आपली मुलगी वामिकाचा चेहरा माध्यमांपासून लपवता आला नाही. त्यामुळे विमानतळावर उपस्थित पापराझी आणि माध्यमांनी वामिकाचे काही फोटो कॅमेऱ्यात कैद केले. मात्र, यावेळी विराट आणि अनुष्का दोघेही माध्यमांना वामिकाचा फोटो न काढण्याची विनंती करताना दिसले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेनंतर अनुष्काने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सर्व पापराझी आणि माध्यमांचे आभार मानले आहेत. अनुष्काने हा संदेश तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत आभार मानले आहेत. पोस्टमध्ये अनुष्काने लिहिले, “वामिकाचे फोटो, व्हिडिओ शेअर न केल्याबद्दल भारतीय पापराझी आणि माध्यमांचे खूप आभारी आहोत. ज्यांनी वामिकाचे फोटो आणि व्हिडिओ काढले आहेत, त्यांना आम्ही पालक या नात्याने विनंती करतो, की त्यांनी तिला पुढे जाण्यास मदत करावी.” ही पोस्ट आणि तिने आणि विराटने लिहिली असल्याचेही अनुष्काने सांगितले.

”आम्हाला आमच्या मुलीची गोपनीयता हवी आहे आणि तिला मीडिया, सोशल मीडियापासून दूर ठेवून स्वतंत्रपणे आयुष्य जगण्याची संधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. ती मोठी झाल्यावर आम्ही तिला अडवू शकत नाही. या परिस्थितीत आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे”, असेही अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

हेही वाचा – Year Ender 2021: आनंदी आनंद गडे..! टोक्यो ऑलिम्पिक अन् भारत; ‘या’ ७ पदकांमुळे देशात उसळली आनंदाची लाट!

विराट आणि अनुष्का यावर्षी ११ जानेवारीला वामिकाचे आई-वडील झाले. मात्र, त्यांच्या मुलीच्या जन्मापासून या दोघांनीही वामिकाचा चेहरा अद्याप सार्वजनिक केलेला नाही. हे दोघेही अनेकदा आपल्या मुलीसोबतचे पाठमोरे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशा परिस्थितीत विराट आणि अनुष्काचे चाहते वामिकाच्या एका झलकची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma thanks paparazzi fans and media for not using photo of daughter vamika adn