भारताला प्रथमच विश्वचषक जिंकून देणारा संघनायक कपिल देव यांना २०१३ या वर्षांकरिता कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात कपिल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन, सचिव संजय पटेल आणि ज्येष्ठ पत्रकार अय्याझ मेमन यांचा समावेश असलेल्या पुरस्कार समितीच्या चेन्नईत झालेल्या बैठकीमध्ये अष्टपैलू कपिल देव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
‘‘कपिल देव निखंज यांना कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि २५ लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१२-१३ या वर्षांचा बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार वितरण समारंभाचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार असून, त्या वेळी कपिल यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे,’’ अशी माहिती बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
भारतीय क्रिकेटला कपिल देव यांनी दिलेले सर्वोच्च योगदान म्हणजे १९८३चा विश्वचषक. एक कर्णधार म्हणून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही बाजू सांभाळत आघाडीवरून लढण्यात त्यांचा हातखंडा होता. २००७मध्ये बीसीसीआयशी बंडखोरी करणाऱ्या काही मंडळींनी इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) सुरू केली होती. कपिल यांनी त्याला आपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे बीसीसीआयने त्यांच्यावर बंदी घातली होती. गेल्या वर्षी कपिल यांनी आयसीएलचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयशी त्यांचे संबंध सुधारले होते. कपिल यांच्या भूमिकेचे स्वागत करून निवृत्त क्रिकेटपटूंना देण्यात येणारा एकरकमी गौरवनिधी दीड कोटी रुपये त्यांना देण्यात आला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा