सध्या सर्वत्र क्रिकेटचा आणि विशेषतः फ्रॅंचाईसीवर आधारित टी२० स्पर्धांचा हंगाम सुरु आहे. आयपीएलच्या धर्तीवर दक्षिण आफ्रिकेने टी२० लीगचे आयोजन केले होते. आता त्यापुढे सध्या अफगाणिस्तान प्रिमीयर लीग स्पर्धेच्या पहिल्या हंगामाची धूम सुरु आहे. या स्पर्धेतील दुसऱ्याच सामन्यात अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खान याने केलेली फलंदाजी ही थक्क करून टाकणारी ठरली. त्याने केलेल्या फटकेबाजीमुळे चाहते खुश झालेच. पण त्याच्या खेळीमुळे हा नक्की गोलंदाज आहे की फलंदाज आहे, असा प्रश्नही चाहत्यांना पडल्यावाचून राहिला नाही.
काबुल झ्वानान या संघाकडून खेळताना रशिदने तुफान फटकेबाजी केली. त्याच्याविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना बल्ख लीजंड्स संघाने १७५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना काबूलचा संघ एके वेळी ५ बाद ७६ अशा परिस्थितीत होता. पण रशीद खान याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने ३ चौकार आणि ५ षटकार फटकवत अर्धशतकी खेळी केली. त्यापैकी ४ षटकार त्याने रवी बोपाराच्या एकाच षटकात मारले आणि चाहत्यांची मने जिंकली.
दरम्यान, या सामन्यात नेदरलँड्सचा खेळाडू रायन टेन देश्कऑटे याच्या नाबाद ८० धावांच्या खेळीमुळे काबुल संघ विजयी झाला.