भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी पार पडला. या निर्णायक सामन्यात शुबमन गिलने धडाकेबाज शतक झळकावले. अहमदाबाद येथे बुधवारी (२ फेब्रुवारी) झालेल्या सामन्यात गिलच्या शतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा १६८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. शुबमनच्या या जबरदस्त खेळीचे आजी माजी खेळाडू कौतुक करत आहे. अशात विराट कोहलीनेही शुबमनचे कौतुक केले आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज (गुरुवार) विराट कोहलीने शुबमनसाठी एक इंस्टा स्टोरी शेअर केली. या स्टोरीत त्यानी शुबमन आणि त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने शुबमनसाठी ‘सितारा’ हा शब्द वापरला आहे. त्याने स्टारचा इमोजीही वापरला आहे. विराटने शुबमनला भारतीय क्रिकेटचे भविष्यही म्हंटले आहे. त्यानी लिहिले, ‘भविष्य येथे आहे’.
२०० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या –
तिसऱ्या टी-२० मध्ये शुबमनने ६३ चेंडूत १२६ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ७ षटकार लगावले. त्याच्या या खेळीमुळे भारताने न्यूझीलंडसमोर २३५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ अवघ्या ६६ धावांवर गारद झाला. सामना जिंकण्याबरोबरच भारताने मालिकाही २-१अशी जिंकली. या निर्णायक सामन्याचा सामनावीर म्हणून शुबमन गिलला गौरविण्यात आले.
हेही वाचा – Sohail Khan: पाकिस्तानी क्रिकेटपटूने कोहली-गंभीरबद्दल ओकले विष; आता भारतीय चाहत्यांकडून होतोय ट्रोल
सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज –
शुबमन गिल भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. गिलच्या आधी केवळ चार भारतीय खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे. या यादीत रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना आणि केएल राहुल यांचे नाव आहे. जागतिक क्रिकेटबद्दल बोलायचे, तर सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा गिल हा दुसरा युवा क्रिकेटपटू ठरला आहे. हा विक्रम सध्या पाकिस्तानच्या अहमद शहजादच्या नावावर आहे, ज्याने वयाच्या २२ वर्षे १२७ दिवसांत हा पराक्रम केला आहे.