पीटीआय, बंगळूरु

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नव्या हंगामासाठी सहभागी दहा संघांना जास्तीत जास्त सहा खेळाडूंना कायम ठेवण्यास ‘आयपीएल’च्या कार्यकारी समितीने मान्यता दिली आहे. ‘आयपीएल’ कार्यकारी समितीने या संदर्भात नवी नियमावली जाहीर केली. कायम ठेवण्यात येणाऱ्या सहा खेळाडूंमध्ये लिलावात एका राइट टू मॅच कार्डचा (आरटीएम) समावेश असेल. लिलावात संघांना १२० कोटी रुपये खर्च करता येतील, मात्र, ‘आरटीएम’ वापर करणाऱ्या खेळाडूची किंमत ७५ कोटी रुपये राहील असे बंधन घालण्यात आले आहे. अखेरच्या ‘आयपीएल’मध्ये संघांना केवळ चार खेळाडू कायम ठेवण्याची मुभा होती.

याचबरोबर ‘बीसीसीआय’चे सचिव यांनी लीगमधील सर्व साखळी लढती खेळणाऱ्या खेळाडूंना ७.५० लाख रुपये इतके सामना मानधन निश्चित करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे या खेळाडूंना अतिरिक्त १.०५ कोटी रुपयांचा फायदा मिळणार आहे. यामुळे आता संघांना लिलावातील १२० कोटी रुपयाच्या खर्चासह अतिरिक्त १२.६० कोटी रुपये देण्याची तयारी ठेवावी लागेल.

हेही वाचा >>>IND vs BAN: मयांक यादव भारतीय संघात, वरुण चक्रवर्ती-जितेश शर्माचं पुनरागमन; बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी संघ जाहीर

कायम ठेवण्यात येणाऱ्या पहिल्या तीन खेळाडूंसाठी अनुक्रमे १८ कोटी, १४ कोटी आणि ११ कोटी रुपये संघ मालकांना राखून ठेवावे लागतील. यानंतर संघ मालकांनी आणखी दोन खेळाडूंची निवड केल्यास त्यांना पुन्हा अनुक्रमे १८ आणि १४ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे एक संघ पाच खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी केवळ ४५ कोटी रुपये खर्च करू शकेल. संघ मालकांनी या पर्यायाची निवड करण्यास नकार दिल्यास त्यांना ‘आरटीएम’ वापरून आणखी १५ खेळाडू विकत घेता येतील. खेळाडू कायम ठेवण्यासाठी भारतीय आणि परदेशी खेळाडूंच्या संख्येवर मात्र बंधन ठेवण्यात आलेले नाही.

थोडक्यात मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमरा आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या एकूण खर्चातून ७५ कोटी रुपये खर्ची होतील.

दरम्यान, शहा यांच्या घोषणेनुसार एक नवोदित भारतीय खेळाडू ‘आयपीएल’मध्ये तीन सामने खेळल्यास तो २० लाख रुपयांच्या पायाभूत किमतीसह २२.५ लाख रुपये अतिरिक्त कमवू शकतो. जर, त्या खेळाडूने हंगामात दहा रणजी करंडक सामने खेळले, तर त्याला २४ लाख रुपयेच मिळतील.

बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा आज

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आज, रविवारी होणाऱ्या वर्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (एजीएम) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकींसाठी भारताच्या दोन प्रतिनिधींची निवड करण्याला प्राधान्य असेल. मात्र, जय शहा यांच्या जागी नवीन सचिव निवडण्याचा कुठलाच प्रस्ताव सभेच्या कार्यक्रमात नाही. महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर दुबईत ‘आयसीसी’चे कॉनक्लेव होणार असल्याने ही सभा महत्त्वपूर्ण आहे. महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना २० ऑक्टोबरला दुबई येथे होणार आहे आणि तोपर्यंत शहा हे ‘बीसीसीआय’च्या सचिवपदी कायम राहतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Approval to retain six players in ipl sport news amy