क्रिकेट विश्वात संपूर्ण भारताला आनंद देणारी एक घटना आजच्या दिवशी ९ वर्षांपूर्वी घडली. आजच्याच दिवशी नऊ वर्षांपूर्वी २ एप्रिल २०११ ला भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे पार पडलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा तो थरार आजही कोणी विसरु शकलेलं नाही. शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या या सामन्याने अनेकांचीच स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं होतं. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचंही स्वप्न या निमित्ताने साकार झालं होतं. ज्यामध्ये संघाशी संलग्न प्रत्येक व्यक्तीसोबतच महत्त्वाची भूमिका निभावली ती म्हणजे महेंद्रसिंह धोनीने…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२८ वर्षांनंतर भारतीय क्रीडारसिकांच्या उत्सहाला उधाण आलं, जेव्हा महेंद्रसिंह धोनीने विजयी षटकार लगावत भारतीय क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशा क्षणाची नोंद केली होती. ११ चेंडूंमध्ये भारतीय क्रिकेट संघाला चार धावांची गरज होती. श्रीलंकेच्या संघाने केलेल्या २७४ धावांचा पाठलाग करत भारतीय संघाचे चार गडी तंबूत परतले होते. ही सर्व परिस्थिती लक्षात घेत स्ट्राईकवर असलेल्या संघाचा तत्कालीन कर्णधार, कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी याने आपलं संपूर्ण बळ आणि महत्त्वाकांक्षी दृष्टी एकवटत चेंडू आला त्याच गतीने मैदानाबाहेर भिरकावला. हा षटकार लगावल्यानंतर काही क्षणांसाठी धोनीची नजर त्या चेंडूवरच खिळली होती, तो क्षण आणि अवघ्या काही तासांचा तो खेळ प्रत्येकाच्याच मनात भावनांचं काहूर माजवून गेला होता, असं म्हणायला हरकत नाही.

असा रंगला होता सामना….

प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेच्या संघानं विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २७४ धावांचा डोंगर रचला होता. ज्यामध्ये महेला जयवर्धनेने १०३ धावा केल्या होत्या. कुमार संघकाराने या सामन्यात ४८ धावा केल्या होत्या. श्रीलंकेच्या खेळाडूंसमोर गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघातील युवराज सिंह आणि झहिर खान या दोघांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले होते. लंकन खेळाडूंच्या फटकेबाजीनंतर चाहत्यांच्या पाठिंब्याच्या साथीने भारतीय संघ मैदानात उतरला. सुरुवातीपासूनच श्रीलंकन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. सेहवाग आणि सचिन हे दोन्ही खेळाडू, ज्यांच्याकडून अनेक अपेक्षा होत्या ते अगदी स्वस्तात तंबूत परतले होते. पण, गौतम गंभीरने भारताची बाजू सांभाळत ९७ धावा केल्या. ज्यात भर पडली ती म्हणजे कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या ९१ धावांची. धोनीच्या या धावांमध्ये त्याच्या फलंदाजीचं कौतुक करावं तितकं कमीच होतं. पण, मुळात त्याने मारलेला शेवटचा षटकारच या सामन्यात खऱ्या अर्थाने ‘चार चाँद’ लावून गेला.

धोनीचा हा षटकार सचिन तेंडुलकरचंही स्वप्न पूर्ण करुन गेला. आपल्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक जिंकण्याची इच्छा सुरुवातीपासूनच सचिनच्या मनात होती. जी धोनीच्या त्या षटकारामुळे आणि संघातील प्रत्येक खेळाडूच्या योगदानामुळे पूर्ण झाली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: April 2 world cup 2011 final india vs sri lanka ms dhoni gautam gambhir wankhede mumbai vjb