भारताची नेमबाजपटू अपुर्वी चंदेलाने ISSF जागतिक क्रमवारीत १० मी. एअर रायफल प्रकारात पहिला क्रमांक पटकावला आहे. १९२६ गुणांची कमाई करत अपुर्वीने ही कामगिरी केली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन अपुर्वीने ही माहिती दिली आहे.

फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्लीत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत चंदेलाने विश्वविक्रमी कामगिरी करत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी बिजींग शहरात झालेल्या स्पर्धेत अपुर्वीला आपल्या दिल्लीतल्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. अपुर्वीने पहिल्या क्रमांकावर झेप घेतल्यानंतर, भारताची दुसरी नेमबाजपटू अंजुम मुद्गीलने दुसरा क्रमांक पटकावला आहे. मुद्गीलच्या खात्यात १६९५ गुण जमा आहेत.

२०२० साली टोकियो शहरात रंगणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या ५ नेमबाजपटूंनी आपलं स्थान पक्क केलं आहे. चंदेलानेही या स्पर्धेत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. याव्यतिरीक्त अभिषेक वर्मा, सौरभ चौधरी, अंजुम मुद्गील आणि दिव्यांश सिंहनेही आपलं स्थान निश्चीत केलं आहे.