भारताची आंतरराष्ट्रीय तिरंदाज प्रतिमा बोरो (वय २२, रा. आसाम) हिने पुण्यातील लष्करी क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तिने कौटुंबिक अडचणीतून ही आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. प्रतिमा हिने २००९ मध्ये शांघाय येथे झालेल्या विश्वचषक तिरंदाजी आणि यावर्षीच्या जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत भारताकडून सहभाग घेतला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रीडा मंत्रालयाने भारतीय तिरंदाजी संघटना बरखास्त केल्याने रिकव्‍‌र्ह प्रकारासाठीचे हे शिबीर ‘साई’च्या केंद्राऐवजी पुण्यातील मुंढवा भागातील लष्करी क्रीडा प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी या शिबिराला प्रतिमा न हजर राहिल्यामुळे तिच्या सहकाऱ्यांनी तिचा शोध घेतला असता तिची खोली आतून बंद होती. त्यांनी बाहेरून आवाज दिले असता प्रतिमाने खोली उघडली नाही. त्यामुळे खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिने पंख्याला चादरीने गळफास लावल्याचे आढळून आले. शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात प्रतिमाचा मृतदेह पाठविण्यात आला आहे.  तिच्या आत्महत्येची माहिती तिच्या पालकांना दिली असून ते आसामहून निघाले आहेत. प्रतिमा ही जमशेदपूर येथील टाटा अकादमीची खेळाडू होती. तिच्या आत्महत्येमागील कारणांचा मुंढवा पोलीस शोध घेत आहेत.

Story img Loader