पॅरिस :नवे वर्ष, नवी ऑलिम्पिक स्पर्धा, भारतीय तिरंदाजांचे ध्येय मात्र तेच…ऑलिम्पिकमधील पदक प्रतीक्षा संपवण्याचे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांना अधिकृतरीत्या २६ जुलैपासून सुरुवात होणार असली, तरी तिरंदाजीची पात्रता फेरी आज, गुरुवारी खेळवली जाणार आहे. यात यशस्वी कामगिरी करून पदकाच्या फेरीपर्यंतचा मार्ग सुकर करण्याचा भारताच्या रीकर्व्ह तिरंदाजांचा प्रयत्न असेल.

१९८८ मध्ये पदार्पण केल्यापासून भारतीय तिरंदाजांनी सातत्याने ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला आहे, पण त्यांना कधीही पदककमाई करता आलेली नाही. आता २०१२च्या लंडन ऑलिम्पिकनंतर प्रथमच भारताचे पुरुष आणि महिला विभागातील सहाही तिरंदाज ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे. त्यांनी क्रमवारीच्या आधारे या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे पुरुष एकेरी आणि सांघिक, महिला एकेरी आणि सांघिक, तसेच मिश्र सांघिक अशा पाचही विभागांत भारताला पदकांची संधी असणार आहे.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द

ऑलिम्पिकमध्ये केवळ तिरंदाजीचा रीकर्व्ह प्रकार खेळवला जातो. यात भारताची मदार तरुणदीप राय आणि दीपिका कुमारी या अनुभवी तिरंदाजांवर असेल. हे दोघेही आपल्या चौथ्या ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत. या दोघांसह अन्य युवा भारतीय तिरंदाजांचे पात्रता फेरीत किमान अव्वल १० मध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न असेल. यात यशस्वी ठरल्यास त्यांना पुढे जाऊन पदकाच्या फेरीपर्यंत पोहोचणे थोडे सोपे होईल.

स्वरूप कसे?

पात्रता फेरीत ५३ देशांतील १२८ तिरंदाजांचा समावेश असेल. यात प्रत्येकाला ७२ वेळा बाण मारण्याची संधी मिळेल. पात्रता फेरीच्या आधारे मानांकन निश्चित केले जाईल आणि या मानांकनानुसार रविवारपासून बाद फेरीला सुरुवात होईल. भारतीय तिरंदाजांसाठी पात्रता फेरी अत्यंत महत्त्वाची असेल. यापूर्वीच्या ऑलिम्पिक स्पर्धांत पात्रता फेरीतील निराशाजनक कामगिरीचा फटका भारताला बसला आहे. त्यामुळे बाद फेरीत कोरियासारख्या तगड्या संघाचा सुरुवातीला सामना करायचा नसल्यास भारतीय तिरंदाजांना पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करावी लागेल.

पुरुष संघ लयीत

भारतीय पुरुष रीकर्व्ह संघाने अलीकडच्या काळात दर्जेदार कामगिरी केली आहे. याच वर्षी शांघाय येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने कोरियाला पराभवाचा धक्का देत सुवर्णपदक पटकावले होते. आता हीच लय ऑलिम्पिकमध्ये राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

तयारीला वादाची किनार…

भारतीय तिरंदाजी संघाच्या ऑलिम्पिक तयारीला वादाची किनार होती. परदेशी प्रशिक्षक बेक वूंग की यांना अधिस्विकृती नाकारण्यात आली आणि त्यांना पॅरिसमधून भारतात परतण्यास सांगण्यात आले. यात चूक कोणाची, यावरून भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) आणि भारतीय तिरंदाजी संघटना यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. बेक यांच्या अनुपस्थितीत पुरुष आणि महिला संघांना सोनम सिंह भुतिया आणि पूर्णिमा माहतो यांचे मार्गदर्शन लाभेल.

संघात कोण?

● भारताच्या पुरुष संघात अनुभवी तरुणदीप राय, प्रवीण जाधव आणि धीरज बोम्मादेवरा यांचा समावेश आहे. तरुणदीप आपल्या चौथ्या ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे. महाराष्ट्राच्या प्रवीणची ही सलग दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. वैयक्तिक विभागात धीरज बोम्मादेवराकडून अपेक्षा बाळगल्या जात आहे.

● महिला संघात दीपिका कुमारी, अंकिता भाकट आणि भजन कौर या तिरंदाज आहेत. वैयक्तिक विभागात दीपिकाच्या कामगिरीकडे लक्ष असेल. अंकिता आणि भजन या दोघीही ऑलिम्पिक पदार्पण करणार आहेत. या तिघींनी मिळून गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते.

दीपिकाच्या कामगिरीकडे लक्ष

महिला विभागात अनुभवी दीपिका कुमारीच्या कामगिरीवरच लक्ष असेल. दीपिकाने एप्रिलमध्ये, मुलीला जन्म दिल्याच्या १६ महिन्यांतच, विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवताना रौप्यपदक मिळवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली होती. आता पॅरिसमध्ये यश मिळवण्यासाठी ती सज्ज झाली आहे. टोक्योमध्ये तिला कोरियाच्या आन सानने पराभूत केले होते. या वेळी आन नसली, तरी कोरियाच्याच लिम सी-ह्युएओनचे आव्हान दीपिकासमोर असेल. लिमने यापूर्वी दोन वेळा दीपिकाचा पराभव केला आहे. आता या पराभवाची परतफेड करतानाच ऑलिम्पिक पदकाची प्रतीक्षा संपवण्याचे दीपिकाचे लक्ष्य असेल.