रिओ दी जनेरिओ : विश्वविजेत्या अर्जेटिनाने निकोलस ओटामेंडीच्या निर्णायक गोलच्या बळावर विश्वचषक फुटबॉलच्या पात्रता फेरीच्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी ब्राझीलवर १-० असा विजय मिळवला. मकाराना स्टेडियममध्ये हजारो चाहते लिओनेल मेसीला संभवत: ब्राझीलमध्ये अखेरचे खेळताना पहायला आलेले. मात्र, ओटामेंडीने (६३व्या मिनिटाला) गोल करत सामन्यात अर्जेटिनाला विजय मिळवून दिला. चाहत्यांमधील वादामुळे सामना उशिराने सुरू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> IPL 2024: आवेश खान-देवदत्त पडिक्कलसाठी राजस्थान आणि लखनऊने घेतला मोठा निर्णय! आता ‘या’ संघासाठी खेळणार

ब्राझीलचा विश्वचषक पात्रता सामन्यांतील आपल्या घरच्या मैदानावर पहिला पराभव आहे. साखळी पद्धतीने खेळवण्यात येत असलेल्या या फेरीत ब्राझीलचा सलग तिसरा पराभव आहे, जी नवीन प्रशिक्षक फर्नाडो डिनिजसाठी चांगली गोष्ट नाही. मेसी जेव्हा ७८व्या मिनिटाला मैदान सोडून बाहेर पडला, तेव्हा ब्राझीलच्या चाहत्यांनी टाळय़ांच्या गजरात त्याला मानवंदना दिली. स्टेडियममधील अनेक मुलांनी बार्सिलोनाची ‘जर्सी’ परिधान केली होती. मेसीने आपल्या कारकीर्दीत बराच काळ बार्सिलोनाकडून खेळताना घालवला. सध्या मेसी अमेरिकेचा क्लब इंटर मियामीकडून खेळतो. सामन्यात राष्ट्रगीत संपल्यानंतर चाहत्यांमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे सामना निर्धारित वेळेच्या २७ मिनिटे उशिराने सुरू झाला. यादरम्यान ब्राझीलचा संघ २२ मिनिटांपर्यंत आतच होता. या वादादरम्यान आठ जणांना अटक करण्यात आल्याचे रिओ पोलिसांनी सांगितले. अर्जेटिना दहा संघाच्या दक्षिण अमेरिका पात्रता स्पर्धेत सहा सामन्यांनंतर १५ गुणांसह शीर्ष स्थानी आहे. यानंतर उरुग्वे व कोलंबिया यांचा क्रमांक लागतो. ब्राझीलचे सात गुण आहेत व ते सहाव्या स्थानी आहेत. पात्रता फेरीच्या अन्य सामन्यात कोलंबियाने पॅराग्वेला १-०, उरुग्वेने बोलिव्हियाला ३-०, तर इक्वेडोरने चिलीला १-० असे पराभूत केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Argentina beat brazil in world cup qualifying match zws
Show comments