अॅटलांटा : गतविजेत्या अर्जेंटिना संघाने यंदाच्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या मोहिमेला विजयी सुरुवात केली. अर्जेंटिनाने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कॅनडाचा २-० असा पराभव केला. फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात विक्रमी सामना खेळणाऱ्या लिओनेल मेसीचा या दोन्ही गोलमध्ये वाटा होता.
पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीनंतर उत्तरार्धात ज्युलियन अल्वारेझ (४९व्या मिनिटाला) आणि लॉटारो मार्टिनेझ (८८व्या मि.) यांनी अर्जेंटिनाकडून गोल केले. अर्जेंटिना संघाला २०२१ मध्ये कोपा अमेरिकेा आणि २०२२ मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर सलग तिसऱ्या मोठ्या विजेतेपदासाठी सर्वाधिक पसंती मिळत आहे. यंदाच्या पहिल्याच सामन्याला मेसीच्या विक्रमी सहभागाची जोड होती. मेसी कोपा अमेरिका स्पर्धेतील हा ३५वा सामना होता.
पूर्वार्धात कॅनडाच्या खेळात अचूकतेचा अभाव होता. गोल करण्याच्या चांगल्या संधी निर्माण करूनही त्यांना गोल करण्यात अपयश आले. अर्जेंटिनाच्या अँजेल डी मारियाने आपल्या मैदानातून चेंडूवर ताबा मिळवत एकट्याने कॅनडाच्या गोलकक्षात धडक मारली होती. मात्र, त्याला गोल करण्यात अपयश आले.
हेही वाचा >>>T20 WC 2024: एडन मारक्रमच्या अफलातून कॅचने फिरली मॅच; उत्कंठावर्धक लढतीत आफ्रिकेचा इंग्लंडवर ७ धावांनी विजय
उत्तरार्धात खेळायला सुरुवात झाल्यावर चारच मिनिटांत अर्जेंटिनाने संधी साधली. मेसीने मॅक अॅलिस्टरकडे पास दिला. त्याने चेंडूचा ताबा घेत खोलवर मुसंडी मारली. या चालीने कॅनडाचा गोलरक्षक मॅक्सिम स्रोपेआऊवर दडपण आले. याचा फायदा उठवून अल्वारेझने अगदी सहजपणे चेंडूला दिशा देत अर्जेंटिनाला आघाडीवर नेले. एका गोलने पिछाडीवर राहिल्यावर कॅनडाच्या खेळाडूंनी आपला खेळ उंचावण्यास सुरुवात केली होता. अशा वेळी अनुभवी मध्यरक्षक निकोलस ओटामेंडी मैदानात उतरल्यावर अर्जेंटिनाच्या बचावाला बळकटी आली. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात राखीव खेळाडू म्हणून उतरलेल्या मार्टिनेझने मेसीच्या पासवर ८८व्या मिनिटाला गोल करून विजय निश्चित केला.
कोपा अमेरिका आणि मेसी
कोपा अमेरिका स्पर्धा आणि मेसी हे एक वेगळे नाते आहे. मेसी कॅनडाविरुद्ध मैदानात उतरला तेव्हा त्याचा कोपा अमेरिका स्पर्धेतील ३५वा सामना होता. त्याने १९५३ मधील चिलीचा गोलरक्षक सर्गिओ लिव्हिंगस्टोनचा विक्रम मागे टाकला. वयाच्या २०व्या वर्षी २००७ मध्ये मेसीने पदार्पण केले आणि २०२१ मध्ये विजेतेपद मिळवले. मेसीने स्पर्धेत १३ गोल केले असून, १८ गोलसाठी साहाय्य केले आहे.