ईस्ट रूदरफोर्ड : लौटारो मार्टिनेझने (८८व्या मिनिटाला) नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर गतविजेत्या अर्जेंटिना संघाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या साखळी सामन्यात चिलीला १-० अशा फरकाने नमवले. सलग दुसऱ्या विजयासह अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.
हेही वाचा >>> युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा : इंग्लंडचा पुन्हा निराशाजनक खेळ; गटात अव्वल राहिल्यानंतरही सावध पवित्र्यामुळे टीकेचे धनी
या सामन्यात ८८व्या मिनिटाला तारांकित आघाडीपटू आणि कर्णधार लिओनेल मेसीच्या कॉर्नर किकवर लिसांड्रो मार्टिनेझने हेडरमार्फत चेंडू गोलच्या दिशेने मारला. मात्र, चेंडू चिलीचा गोलरक्षक क्लॉडियो ब्राव्होच्या समोर पडला आणि त्यावर जिओवानी लो सेल्सोने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने मारलेला फटका ब्राव्होने लांब ढककला. चेंडू चिलीच्या इगोर लिचनोव्स्कीकडे गेला आणि त्याचा चेंडू लांब मारण्याचा प्रयत्न फसला. त्यावेळी लौटारो मार्टिनेझने चेंडूला गोलजाळ्यात मारत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. मार्टिनेझचा हा स्पर्धेतील दुसरा गोल होता, तर राष्ट्रीय संघाकडून खेळताना त्याचा हा एकूण २६वा गोल होता. अर्जेंटिनाने आघाडी अखेरपर्यंत राखत विजय नोंदवला.
कॅनडाची सरशी
आघाडीपटू जॉनथन डेव्हिडने (७४व्या मि.) केलेल्या गोलमुळे कॅनडाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत पेरूवर १-० अशा फरकाने विजय नोंदवला. कॅनडाचा २४ वर्षांत पेरूविरुद्धचा हा पहिलाच विजय आहे.