ह्युस्टन : पेनल्टी शूटआऊटमध्ये लिओनेल मेसीला चेंडू गोलजाळ्यात मारण्यात अपयश आले, पण गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने चमकदार कामगिरी केल्यामुळे अर्जेंटिनाने इक्वेडोरला पराभूत करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. निर्धारित वेळेतील १-१ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये गतविजेत्या अर्जेंटिनाने ४-२ अशी बाजी मारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पायाच्या दुखापतीमुळे मेसीच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह होते. परंतु प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी मेसीला सुरुवातीपासून खेळवण्याचा निर्णय घेतला. मेसीला फारसा त्रासही जाणवला नाही. मात्र, यंदाच्या स्पर्धेत त्याची गोलची पाटी पुन्हा कोरीच राहिली. अर्जेंटिनालाही इक्वेडोरचे आव्हान परतवून लावताना बराच संघर्ष करावा लागला. एकीकडे अर्जेंटिनाने साखळी फेरीत आपले सर्व सामने जिंकले होते, तर इक्वेडोरला केवळ एकच विजय मिळवता आला होता. असे असले तरी, शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इक्वेडोरने अर्जेंटिनाला झुंजवले.

हेही वाचा >>> विश्वविजेत्या टीम इंडियासाठी मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; ‘एवढ्या’ कोटींचं बक्षीस जाहीर

अर्जेंटिनाने सामन्याची सुरुवात चांगली केली. ३५व्या मिनिटाला अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टरच्या पासवर बचावपटू लिसांड्रो मार्टिनेझने गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. त्यांनी ही आघाडी बराच वेळ टिकवली. त्यातच ६२व्या मिनिटाला गोलकक्षात अर्जेंटिनाचा मध्यरक्षक रॉड्रिगो डे पॉलच्या हाताला चेंडू लागल्याने इक्वेडोरला पेनल्टी मिळाली. मात्र, यावर एनर व्हेलेंसियाने मारलेला फटका गोलपोस्टला लागल्याने अर्जेंटिनाची आघाडी कायम राहिली. अर्जेंटिना हा सामना जिंकणार असे वाटू लागले असतानाच ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेतील पहिल्या मिनिटाला केव्हिन रॉड्रिगेजने गोल करत इक्वेडोरला १-१ अशी बरोबरी करून दिली. त्यानंतर ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ उपलब्ध नसल्याने बरोबरीची ही कोंडी फोडण्यासाठी थेट पेनल्टी शूटआऊटचा आधार घ्यावा लागला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Argentina beat ecuador to reach the semi finals of the copa america zws
Show comments