फुटबॉलमधील अनेक मातब्बर संघांमध्ये गुरुवारी रात्री आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामने झाले. लिओनेल मेस्सीविना खेळणाऱ्या अर्जेटिनाने इराकविरुद्धच्या सामन्यासाठी दुय्यम संघ उतरवला तरीही त्यांनी इराकची ४-० अशी धूळदाण उडवली. हंगामी प्रशिक्षक लिओनेल स्कॅलोनी यांनी नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली तरी लॉटेरो मार्टिनेझ, रॉबेर्टो पेरेयरा, जर्मन पेझेल्ला आणि फ्रान्को सेर्वी यांनी गोल झळकावत अर्जेटिनाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

ख्रिस्तियानो रोनाल्डोशिवाय खेळणाऱ्या पोर्तुगालने पोलंडचा ३-२ असा धुव्वा उडवला. त्यामुळे १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या पोलंडच्या रॉबर्ट लेवानडोव्हस्कीच्या विजयी जल्लोषावर पाणी फेरले. आंद्रे सिल्वा, कॅमिल ग्लिक (स्वयंगोल) आणि बर्नाडरे सिल्वा यांनी २० मिनिटांच्या अंतरावर गोल करून पोर्तुगालला विजय मिळवून दिला. पोलंडकडून क्रायझॉफ पायटेक आणि याकूब ब्लास्कीकोव्हस्की यांनी गोल केले.

अन्य सामन्यात, स्पेनने वेल्सचा ४-१ असा धुव्वा उडवला. पॅको अल्कासरचे दोन गोल आणि सर्जियो रामोस आणि मार्को बार्टरा यांनी त्याला दिलेली साथ यामुळे स्पेनने दमदार विजयाची नोंद केली. कायलन एम्बापेने केलेल्या झुंजार कामगिरीमुळे विश्वविजेत्या फ्रान्सने पराभवाची नामुष्की टाळली. फ्रान्सने आइसलँडविरुद्धची ही मैत्रीपूर्ण लढत २-२ अशी बरोबरीत सोडवली. बिरकिर जार्नासन आणि कारी आर्नासन यांनी आइसलँडला दुसऱ्या सत्रात २-० असे आघाडीवर आणले होते. त्यानंतर अखेरच्या अध्र्या तासाचा खेळ शिल्लक असताना मैदानात उतरलेल्या एम्बापेने गोल करीत फ्रान्सला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्यानंतर ९०व्या मिनिटाला दुसरा गोल करून फ्रान्सला बरोबरी मिळवून दिली.