एपी, अल रायन
लिओनेल मेसीच्या गोलमुळे अर्जेटिनाने ऑस्ट्रेलियावर २-१ अशा फरकाने विजय मिळवत ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मेसीने आपल्या कारकीर्दीतील १०००वा सामना खेळताना विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील आपला पहिला गोल झळकावला. उपांत्यपूर्व फेरीत अर्जेटिनाचा सामना नेदरलँड्सशी होईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयासाठी अर्जेटिनाला झगडावे लागले. अर्जेटिनाच्या विजयात गोलरक्षक एमी मार्टिनेजची भूमिका महत्त्वाची राहिली. त्याने सामन्याच्या अखेरच्या सेकंदांमध्ये शानदार कामगिरी करत सामना अतिरिक्त वेळेपर्यंत नेण्यापासून रोखला. मेसीने सामन्याच्या ३५व्या मिनिटाला अर्जेटिनाला आघाडी मिळवून दिली. यानंतर ज्यूलियन अल्वारेझने (५७वे मि.) गोल करत अर्जेटिनाची आघाडी २-० अशी केली. सामन्याच्या ७७व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या पुनरागमनाच्या आशा निर्माण झाल्या, जेव्हा एंझो फर्नाडेझने स्वयंगोल करत आघाडी कमी केली.
सामन्यात ०-२ अशा पिछाडीनंतर अखेरच्या २० मिनिटांमध्ये ऑस्ट्रेलियाने चांगला खेळ केला. ७७व्या मिनिटाला क्रेग गुडविनचा फटका अर्जेटिनाच्या फर्नाडेझला लागून गोल झाला. ऑस्ट्रेलियाने यानंतर आपले आक्रमण अधिक तीव्र केले. संघाला अखेरच्या काही मिनिटांमध्ये बरोबरी साधण्याची संधी होती. त्यांच्या गेरेंग कुओलचा फटका अर्जेटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझने रोखला.
नक्की वाचा >> विश्लेषण: मेसी, रोनाल्डोचे विक्रम मोडेल अशी क्षमता फ्रान्सच्या किलियन एम्बापेमध्ये आहे का?
अर्जेटिनाला विश्वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात सौदी अरेबियाकडून पराभूत व्हावे लागले. यानंतर त्यांनी दमदार पुनरागमन केले आणि संघाने सलग तीन सामने जिंकले.आपला पाचवा आणि संभवत: अखेरचा विश्वचषक खेळणाऱ्या मेसीच्या नावे व्यावसायिक फुटबॉलमध्ये ७८९ गोल आहेत. सात वेळा वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरलेल्या मेसीच्या नजरा १८ डिसेंबरच्या अंतिम सामन्याकडे आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अर्जेटिनाला पािठबा देण्यासाठी स्टेडियममध्ये हजारो चाहत्यांची गर्दी होती.
मेसीने मॅराडोना, रोनाल्डोला मागे टाकले
अर्जेटिनाच्या विजयात योगदान देणाऱ्या मेसीने आपल्याच देशाचा माजी फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांना मागे टाकले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोल झळकावत त्याने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नऊ गोल केले असून त्याने मॅराडोना आणि रोनाल्डोच्या (८) विक्रमाला मागे टाकले.