फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. फ्रान्सचा स्टार खेळाडू किलियन एमबाप्पे आणि अर्जेंटिनाचा हुकमी एक्का लिओनेल मेस्सी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगतदार केला. पण १२० मिनिटांच्या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली असतानाच पेनल्टी शूटआऊटमध्ये अखेर अर्जेंटिनाने बाजी मारली. त्यानंतर संपूर्ण जगभरात मेस्सीच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. ३६ वर्षानंतर अर्जेंटिनाला विश्वचषकाचे जेतेपद जिंकवून देण्याचं मेस्सीचं स्वप्न अखेर साकार झालं. कारण याचंच एक उत्तम उदाहरण मेस्सीच्या इन्स्टाग्रामवर हॅंडलवर पाहायला मिळेल. अंतिम सामन्यात फ्रान्सच्या खेळाडूंची झोप उडवणाऱ्या मेस्सीला अखेर त्याच्या बेडरुममध्ये प्रदीर्घ काळानंतर शांत झोप मिळाली. कारण गोल्डन ट्रॉफीसोबत बेडरुममध्ये गाढ झोपेत असलेला फोटो मेस्सीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसंच फोटो शेअर करुन त्याने गुड मॉर्निंग असं कॅप्शनही दिलं आहे.
मेस्सीने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टला तासाभरानंतर तब्बल एक कोटीहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर २० लाखांहून अधिक चाहत्यांनी त्याच्या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हे तुझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं. आम्हाला याचा मनापासून आनंद होतोय.” अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षावही केला आहे. फ्रान्स आणि अर्जेंटिनाच्या महामुकाबल्यात अर्जेंटिनाने विश्वचषकावर प्रदीर्घ काळानंतर नाव कोरल्यानं सर्वत्र जल्लोष करण्यात आला. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडून लिओनेल मेस्सी आणि फ्रान्सचा किलियन एमबाप्पे यांच्यात रंगतदार लढत पाहायला मिळाली. १२० मिनिटांच्या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे स्टेडियममध्ये असलेल्या हजारो प्रेक्षकांची जेतेपदाचा गोल बघण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मेस्सी विरुद्ध एमबाप्पे यांच्यातच रंगतदार सामना होत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं.
इथे पाहा मेस्सीने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट
मात्र सामना बरोबरीत झाल्यामुळं पेनल्टी शूटआऊटमध्ये अखेर अर्जेंटिनानेच बाजी मारली. सुरुवातीला सामना अर्जेंटिनाच्या बाजूने एकतर्फी जात होता, मात्र, एमबाप्पेने गोल करण्याची हॅट्रिक करुन अर्जेंटिनाच्या नाकी नऊ आणले होते. मात्र, मेस्सीनेही जीवाची बाजी लावत पेनेल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाला विजयाच्या दिशेनं नेलं. २०१४ला विश्वचषकात जेतेपद पटकावण्याचं भंगलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धारानेच अर्जेंटिनाचा संघ मैदानावर उतरला. लिओनेल मेस्सीचं अखेरच्या विश्वचषक स्पर्धेत विजयाला गवसणी घालण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जेंटिनाच्या प्रत्येक खेळाडूने कंबर कसली. फ्रान्सकडूनही अर्जेंटिनाला जशाच तसं उत्तर देण्यात आलं. किलियन एमबाप्पे एकटा भिडला आणि अर्जेंटिनाच्या नाकी नऊ आणले. १२० मिनिटांच्या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली अन् पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली.