आज मध्यरात्री विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत अर्जेटिनाच्या कर्णधारावर नजर
वृत्तसंस्था, दोहा : लुका मॉड्रिचच्या नेतृत्वाखालील क्रोएशियाने ब्राझील आणि नेयमारचे विश्वचषक विजयाचे स्वप्न मोडले. आता अर्जेटिना आणि त्यांचा कर्णधार लिओनेल मेसीला स्पर्धेबाहेर करण्यासाठी क्रोएशियाचा संघ प्रयत्नशील असेल. ३५ वर्षीय मेसीने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर अर्जेटिनाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले आहे. मात्र, मंगळवारी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत क्रोएशियाचा अडथळा पार करण्यासाठी मेसीला अर्जेटिनाच्या अन्य खेळाडूंची साथ लाभणे गरजेचे आहे.
फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या मेसीने आपल्या कारकीर्दीत जवळपास सर्वच स्पर्धा जिंकल्या आहेत. मात्र, विश्वचषक विजयाने त्याला हुलकावणी दिली आहे. मेसीच्या अर्जेटिनाने २०१४च्या विश्वचषकाची अंतिम फेरीही गाठली होती. मात्र, जर्मनीकडून पराभव पत्करावा लागल्याने मेसीचे विश्वविजयाचे स्वप्न अधुरेच राहिले. यंदाचा विश्वचषक मेसीचा अखेरचा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे विश्वचषक जिंकून फुटबॉल इतिहासातील आपले स्थान अधिकच अढळ करण्यासाठी मेसी प्रयत्नशील आहे.
मेसीने यंदाच्या विश्वचषकात लौकिकाला साजेशी कामगिरी करताना पाचपैकी चार सामन्यांत गोल केले आहेत. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सविरुद्ध गोल नोंदवले. मेसीने स्वत: गोल करतानाच इतरांसाठीही गोलच्या संधी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे त्याला रोखणे हे क्रोएशियापुढील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. मात्र, क्रोएशियाचा भक्कम बचाव भेदणे मेसीला सोपे जाणार नाही.
४० लाख लोकसंख्या असलेल्या क्रोएशियाने गेल्या काही वर्षांत फुटबॉल जगतात स्वत:साठी वेगळी ओळख निर्माण केली आहे. भक्कम बचाव आणि शिस्तबद्ध खेळ करणाऱ्या क्रोएशियाने गेल्या विश्वचषकात उपविजेतेपद मिळवले होते. यंदा क्रोएशियाच्या संघाला सर्वोत्तम कामगिरी करता आली नसली, तरी मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात क्रोएशियाचा संघ सक्षम आहे. विशेषत: पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवणे ही क्रोएशियाची खासियत आहे. त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत जपान आणि उपांत्य फेरीत ब्राझीलचे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्येच संपुष्टात आणले. आता अर्जेटिना आणि मेसीला धक्का देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
२०१८ साली झालेल्या गेल्या विश्वचषकात क्रोएशियाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. या स्पर्धेच्या साखळी फेरीत क्रोएशियाने अर्जेटिनाचा ३-० असा पराभव केला होता. आता या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी ते उत्सुक असतील. मॉड्रिच, माटेओ कोव्हाचिच आणि मार्सेलो ब्रोझोव्हिच या मध्यरक्षकांच्या अनुभवाचा क्रोएशियाला फायदा होऊ शकेल. विशेषत: मॉड्रिचपासून अर्जेटिनाला सावध राहावे लागेल.
अर्जेटिनाची भिस्त मेसीवरच असेल. विश्वचषकात सहभागी होण्यापूर्वी अर्जेटिनाचा संघ सलग ३६ सामने अपराजित होता आणि यादरम्यान त्यांनी कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपदही पटकावले होते. परंतु पहिल्याच साखळी फेरीत अर्जेटिनाला सौदी अरेबियाकडून १-२ असा पराभवाचा धक्का बसला. मात्र, त्यानंतर त्यांनी मेक्सिको आणि पोलंडवर मात करत बाद फेरी गाठली. उपउपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सविरुद्ध विजयासाठी अर्जेटिनाला झगडावे लागले. मात्र, पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे अर्जेटिनाला विजय मिळवणे शक्य झाले. मार्टिनेझने नेदरलँड्सच्या दोन खेळाडूंच्या पेनल्टी अडवल्या.
आता उपांत्य फेरीतील सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेल्यास मार्टिनेझ आणि क्रोएशियाचा गोलरक्षक डॉमिनिक लिव्हाकोव्हिचची भूमिका महत्त्वाची ठरेल. लिव्हाकोव्हिचने गेल्या दोन सामन्यांत मिळून चार पेनल्टी अडवल्या आहेत. तसेच क्रोएशियाचा संघ विश्वचषकातील पेनल्टी शूटआऊटमध्ये एकदाही पराभूत झालेला नाही. त्यामुळे हा सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत जाणार नाही, अशी मेसी आणि अर्जेटिनाला आशा असेल.
संभाव्य संघ
क्रोएशिया : डॉमिनिक लिव्हाकोव्हिच; जोसिप जुरानोव्हिच, डेयान लोव्हरेन, जोस्को ग्वार्डियोल, बोर्ना सोसा; लुका मॉड्रिच, मार्सेलो ब्रोझोव्हिच, माटेओ कोव्हाचिच; मारियो पासालिच, आंद्रे क्रॅमरिच, इव्हान पेरेसिच
- संघाची रचना : (४-३-३)
अर्जेटिना : एमिलियानो मार्टिनेझ; नाहुएल मोलिना, निकोलस ओटामेन्डी, लिसान्ड्रो मार्टिनेझ, निकोलस टागलियाफिको; अॅन्जेल डी मारिया, रॉड्रिगो डी पॉल, एन्झो फर्नाडेस, अलेक्सिस मॅक अॅलिस्टर; लिओनेल मेसी, ज्युलियन अल्वारेझ
- संघाची रचना : (४-४-२)
मी केवळ एका खेळाडूविरुद्ध नाही, तर जागतिक फुटबॉलमधील एका आघाडीच्या संघाविरुद्ध खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे. एका खेळाडूवर लक्ष केंद्रित करणे योग्य ठरणार नाही. मेसी किती उत्कृष्ट खेळाडू आहे, हे सर्वाना ठाऊक आहेच. तो अर्जेटिनाचा सर्वोत्तम खेळाडू आहे आणि त्याला रोखणे हे मोठे आव्हान असेल. मात्र, त्यांच्याकडे अन्यही दर्जेदार खेळाडू आहेत. आम्ही सर्वोत्तम कामगिरी करून विजय मिळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू.
– लुका मॉड्रिच, क्रोएशियाचा कर्णधार
- वेळ : मध्यरात्री १२.३० वा.
- थेट प्रक्षेपण : स्पोर्टस १८-१, १ एचडी, स्पोर्टस १८ खेल, जिओ सिनेमा
- ठिकाण : लुसेल स्टेडियम
आमनेसामने
- अर्जेटिना विजय : २
- क्रोएशिया विजय : २
- बरोबरी : १