ब्यूनॉस आयर्स : तारांकित फुटबॉलपटू लिओनेल मेसीने झळकावलेल्या हॅट्ट्रिक च्या जोरावर अर्जेंटिनाने दक्षिण अमेरिका विश्वचषक फुटबॉल पात्रता सामन्यात बोलिव्हियावर ६-० असा विजय मिळवला. या कामगिरीनंतर अर्जेंटिनाचे १० सामन्यांनंतर २२ गुण झाले असून ते गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे. त्यांच्या तीन गुण मागे कोलंबिया संघ आहे. ब्राझील संघ १६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. शीर्ष सहा संघ हे विश्वचषक स्पर्धेतील आपले स्थान निश्चित करतील.

ऑक्टोबरमधील यापूर्वी झालेल्या दोन टप्प्यातील सामन्यांमध्ये मेसी दुखापतीमुळे सहभागी झाला नव्हता. मात्र, या सामन्यात तो पूर्णवेळ मैदानावर होता व संघाच्या विजयात त्याने निर्णायक भूमिका पार पाडली. सामन्याच्या १९व्या मिनिटाला गोल करत मेसीने संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर लौटारो मार्टिनेझ (४३व्या मि.) व ज्युलियन अल्वारेझ यांनी गोल करत मध्यंतरापर्यंत संघाला ३-० अशा भक्कम आघाडीवर नेले. दुसऱ्या सत्रात थिआगो अलमाडाने (६९व्या मि.) गोल झळकावत संघाच्या खात्यात चौथ्या गोलचा भरणा केला. मग, मेसीने तीन मिनिटांच्या आत आणखी दोन गोल करत चमक दाखवली. मेसीने दोन गोल करण्यात साहाय्यही केले.

हेही वाचा >>>भारत-न्यूझीलंड कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे रद्द, BCCI ने बदलली सामन्याची वेळ; दुसऱ्या दिवसाचा सामना….

अन्य सामन्यात, राफिन्हाच्या दोन गोलच्या जोरावर ब्राझीलने पेरूवर ४-० अशा फरकाने विजय नोंदवला. सामन्यातील पहिला गोल राफिन्हाने करत संघाला आघाडीवर नेले. दुसऱ्या सत्रात ब्राझीलने आपला खेळ उंचावताना तीन गोल केले. यामधील एक गोल राफिन्हा तर, अन्य गोल आंद्रेआस पेरेरा (७१व्या मि.) व लुईझ हेन्रिक (७४व्या मि.) यांनी केले.