मारियो केम्प्स आणि दिएगो मॅराडोना यांनी अनुक्रमे १९७८ आणि १९८६मध्ये फिफा विश्वचषक जिंकून दिल्यानंतर अर्जेटिनाला उपांत्यपूर्व फेरीपलीकडे झेप घेता आलेली नाही. प्रत्येक वेळी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असूनही अर्जेटिनाची घोडदौड अंतिम आठ संघांपुढे गेलेली नाही. मात्र या वेळी अर्जेटिनासाठी अनुकूल परिस्थिती आहे. यजमान ब्राझीलपेक्षाही दमदार संघ, अव्वल आघाडीवीर, लिओनेल मेस्सीचा सुरेख फॉर्म या सर्व गोष्टी तिसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकण्याकरिता अर्जेटिनाच्या पथ्यावर पडणार आहेत. त्यामुळे या वेळी फिफा विश्वचषकात ‘अब की बार.. अर्जेटिनाच दावेदार’ हा नारा घुमणार आहे.
दक्षिण अमेरिकेतील गटातून नऊ देशांच्या पात्रता फेरीत अर्जेटिनाने सहजपणे अव्वल स्थान पटकावत फिफा विश्वचषकाचे तिकिट निश्चित केले. पात्रता फेरीत उरुग्वे आणि व्हेनेझुएलाने घरच्या मैदानावर अर्जेटिनाला पराभवाचा धक्का दिला. बाकीच्या सर्व सामन्यांत अर्जेटिनाने अपराजित राहण्याची किमया केली. पात्रता फेरीत मेस्सीने तब्बल १२ गोल झळकावले.
चार वेळा बलॉन डी’ऑर हा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणारा लिओनेल मेस्सी देशासाठी मात्र चांगली कामगिरी करत नाही, अशी टीका त्याच्यावर वारंवार होत होती. पण अलेजांड्रो सबेला यांनी अर्जेटिनाचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यापासून क्लब आणि देश या दोन्ही आघाडय़ांवर मेस्सीची चमक पाहायला मिळत आहे. गोल करण्याच्या बाबतीत जवळपास सर्वच विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या मेस्सीने ऑक्टोबर २०११पासून झालेल्या २१ सामन्यांत तब्बल २० गोल लगावले आहेत. विश्वचषक जिंकल्यावरच मेस्सी महान फुटबॉलपटूंच्या पंक्तीत स्थान मिळवेल, असे त्याच्याबाबतीत बोलले जात आहे. त्यामुळे टीकाकारांना चोख उत्तर देण्यासाठी मेस्सीला आता देशासाठी काहीतरी करून दाखवावे लागणार आहे. अँजेल डी मारियाची मेहनत घेण्याची वृत्ती आणि तांत्रिकदृष्टय़ा सक्षम असल्यामुळे अर्जेटिनाची मधली फळी भक्कम बनली आहे. तसेच मेस्सीसह गोंझालो हिग्युएन आणि सर्जीओ अ‍ॅग्युरो यांच्यामुळे आक्रमणात अनेक पर्याय अर्जेटिनासमोर असणार आहेत.
अर्जेटिना (फ-गट)
* फिफा क्रमवारीतील स्थान : ७
विश्वचषकातील कामगिरी
*  सहभाग : १५ वेळा (२०१४सह)
*  जेतेपद : १९७८, १९८६
*  उपविजेतेपद : १९३०, १९९०
*  उपांत्यपूर्व फेरी : १९६६, १९९८, २००६, २०१०
संभाव्य संघ
गोलरक्षक : सर्जीओ रोमेरो, मारिआनो आंदुजार, ऑगस्टिन ओरियन. बचाव फळी : पाबलो झाबालेटा, फेडेरिको फर्नाडेझ, इझेक्वायल गॅरे, मार्कोस रोजो, ह्य़ुगो कॅम्पागनॅरो, मार्टिन डेमिचेलिस, जोस बॅसन्ता, निकोलस ओटामेंडी. मधली फळी : जेवियर मॅस्केरानो, फर्नाडो गागो, लुकास बिग्लिया, इव्हेर बनेगा, रिकाडरे अल्वारेझ, ऑगस्टो फर्नाडेझ, जोस सोसा, अँजेल डी मारिया, मॅक्सी रॉड्रिगेझ, इन्झो पेरेझ. आघाडीची फळी : लिओनेल मेस्सी (कर्णधार), गोंझालो हिग्युएन, सर्जीओ अ‍ॅग्युरो, रॉड्रिगो पॅलासियो, इझेक्वायल लॅवेझ्झी.
*  स्टार खेळाडू : लिओनेल मेस्सी, गोंझालो हिग्युएन, सर्जीओ अ‍ॅग्युरो, सर्जीओ रोमेरो, अँजेल डी मारिया.
*  व्यूहरचना : ४-३-३, ५-३-२

*मुख्य प्रशिक्षक : अलेजांड्रो सबेला
बलस्थाने आणि कच्चे दुवे
अँजेल डी मारिया, सर्जीओ अ‍ॅग्युरो, गोंझालो हिग्युएन आणि लिओनेल मेस्सी ही चौकडी म्हणजे अर्जेटिनाच्या यशाचे रहस्य ठरणार आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. लिओनेल मेस्सी दुखापतीतून सावरतोय, हीसुद्धा अर्जेटिनासाठी चांगली बाब म्हणावी लागेल. मेस्सीच्या गुणवत्तेबद्दल कुणालाच शंका नाही. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता, लिओनेल मेस्सी = अर्जेटिनाचा विजय हेच समीकरण बऱ्याच सामन्यांत पाहायला मिळणार आहे. सर्वोत्तम आक्रमक फळी असताना प्रशिक्षक सबेला यांना कमकुवत बचावाच्या बाबतीत चिंता सतावत आहे. अर्जेटिनाचा संघ समतोल वाटत नाही, अशी टीकाही त्यांच्यावर होतेय. गोलरक्षक सर्जीओ रोमेरो सध्या फॉर्मात नाही. त्याचबरोबर बचावपटू फेडेरिको फर्नाडेझला आंतरराष्ट्रीय स्तरावर तितका अनुभव नाही.
अपेक्षित कामगिरी
फिफा विश्वचषकात पदार्पण करणारा बोस्निया आणि हेझ्रेगोविना तसेच नायजेरिया आणि इराण या संघांचा समावेश असलेल्या फ गटात अर्जेटिनाचे वर्चस्व राहणार आहे. ‘फ’ गटात अर्जेटिना संघ अव्वल स्थान पटकावणार, यात कुणालाही तिळमात्र शंका नाही. बाद फेरीत अर्जेटिनासमोर स्वित्र्झलड आणि फ्रान्स यांचे आव्हान असणार आहे. हे आव्हान अर्जेटिना सहजपणे पेलेल, अशी शक्यता आहे. मात्र उपांत्यपूर्व फेरीत किंवा उपांत्य फेरीत त्यांना ब्राझील किंवा स्पेनचा झंझावात रोखावा लागणार आहे. जेतेपदासाठी दावेदार असलेल्या या संघांवर मात केल्यास, अर्जेटिनाला तिसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी मिळेल.