मारियो केम्प्स आणि दिएगो मॅराडोना यांनी अनुक्रमे १९७८ आणि १९८६मध्ये फिफा विश्वचषक जिंकून दिल्यानंतर अर्जेटिनाला उपांत्यपूर्व फेरीपलीकडे झेप घेता आलेली नाही. प्रत्येक वेळी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असूनही अर्जेटिनाची घोडदौड अंतिम आठ संघांपुढे गेलेली नाही. मात्र या वेळी अर्जेटिनासाठी अनुकूल परिस्थिती आहे. यजमान ब्राझीलपेक्षाही दमदार संघ, अव्वल आघाडीवीर, लिओनेल मेस्सीचा सुरेख फॉर्म या सर्व गोष्टी तिसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकण्याकरिता अर्जेटिनाच्या पथ्यावर पडणार आहेत. त्यामुळे या वेळी फिफा विश्वचषकात ‘अब की बार.. अर्जेटिनाच दावेदार’ हा नारा घुमणार आहे.
दक्षिण अमेरिकेतील गटातून नऊ देशांच्या पात्रता फेरीत अर्जेटिनाने सहजपणे अव्वल स्थान पटकावत फिफा विश्वचषकाचे तिकिट निश्चित केले. पात्रता फेरीत उरुग्वे आणि व्हेनेझुएलाने घरच्या मैदानावर अर्जेटिनाला पराभवाचा धक्का दिला. बाकीच्या सर्व सामन्यांत अर्जेटिनाने अपराजित राहण्याची किमया केली. पात्रता फेरीत मेस्सीने तब्बल १२ गोल झळकावले.
चार वेळा बलॉन डी’ऑर हा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणारा लिओनेल मेस्सी देशासाठी मात्र चांगली कामगिरी करत नाही, अशी टीका त्याच्यावर वारंवार होत होती. पण अलेजांड्रो सबेला यांनी अर्जेटिनाचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यापासून क्लब आणि देश या दोन्ही आघाडय़ांवर मेस्सीची चमक पाहायला मिळत आहे. गोल करण्याच्या बाबतीत जवळपास सर्वच विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या मेस्सीने ऑक्टोबर २०११पासून झालेल्या २१ सामन्यांत तब्बल २० गोल लगावले आहेत. विश्वचषक जिंकल्यावरच मेस्सी महान फुटबॉलपटूंच्या पंक्तीत स्थान मिळवेल, असे त्याच्याबाबतीत बोलले जात आहे. त्यामुळे टीकाकारांना चोख उत्तर देण्यासाठी मेस्सीला आता देशासाठी काहीतरी करून दाखवावे लागणार आहे. अँजेल डी मारियाची मेहनत घेण्याची वृत्ती आणि तांत्रिकदृष्टय़ा सक्षम असल्यामुळे अर्जेटिनाची मधली फळी भक्कम बनली आहे. तसेच मेस्सीसह गोंझालो हिग्युएन आणि सर्जीओ अॅग्युरो यांच्यामुळे आक्रमणात अनेक पर्याय अर्जेटिनासमोर असणार आहेत.
अर्जेटिना (फ-गट)
* फिफा क्रमवारीतील स्थान : ७
विश्वचषकातील कामगिरी
* सहभाग : १५ वेळा (२०१४सह)
* जेतेपद : १९७८, १९८६
* उपविजेतेपद : १९३०, १९९०
* उपांत्यपूर्व फेरी : १९६६, १९९८, २००६, २०१०
संभाव्य संघ
गोलरक्षक : सर्जीओ रोमेरो, मारिआनो आंदुजार, ऑगस्टिन ओरियन. बचाव फळी : पाबलो झाबालेटा, फेडेरिको फर्नाडेझ, इझेक्वायल गॅरे, मार्कोस रोजो, ह्य़ुगो कॅम्पागनॅरो, मार्टिन डेमिचेलिस, जोस बॅसन्ता, निकोलस ओटामेंडी. मधली फळी : जेवियर मॅस्केरानो, फर्नाडो गागो, लुकास बिग्लिया, इव्हेर बनेगा, रिकाडरे अल्वारेझ, ऑगस्टो फर्नाडेझ, जोस सोसा, अँजेल डी मारिया, मॅक्सी रॉड्रिगेझ, इन्झो पेरेझ. आघाडीची फळी : लिओनेल मेस्सी (कर्णधार), गोंझालो हिग्युएन, सर्जीओ अॅग्युरो, रॉड्रिगो पॅलासियो, इझेक्वायल लॅवेझ्झी.
* स्टार खेळाडू : लिओनेल मेस्सी, गोंझालो हिग्युएन, सर्जीओ अॅग्युरो, सर्जीओ रोमेरो, अँजेल डी मारिया.
* व्यूहरचना : ४-३-३, ५-३-२
अब की बार…
मारियो केम्प्स आणि दिएगो मॅराडोना यांनी अनुक्रमे १९७८ आणि १९८६मध्ये फिफा विश्वचषक जिंकून दिल्यानंतर अर्जेटिनाला उपांत्यपूर्व फेरीपलीकडे झेप घेता आलेली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-05-2014 at 10:49 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Argentina world cup 2014 team guide for fifa tournament