भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं स्वप्न अखेर साकार झालं आहे. एक वर्ष मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्ये बसून असलेल्या अर्जुन तेंडुलकरला पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सच्या अंतिम ११ जणांच्या संघात स्थान मिळालं आहे. आज (१६ एप्रिल) अर्जुन तेंडुलकरने इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत पदार्पण केलं आहे. अर्जुनला २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने २० लाख रुपये इतक्या बेस प्राईसवर खरेदी केलं होतं. त्यानंतर २०२३ मध्ये मुंबईने त्याला २५ लाख रुपये इतक्या किंमतीत पुन्हा खरेदी केलं.
सामना सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने अर्जुनला त्याची पदार्पणाची कॅप (मुंबई इंडियन्सची टोपी) दिली. ही कॅप घालताना अर्जुनचा आनंद गगनात मावत नव्हता. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव आज मुंबईच्या संघाचं नेतृत्व करत आहे. सूर्यकुमारने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आणि पहिल्या षटकात अर्जुनकडेच चेंडू सोपवला. पहिल्या षटकात गोलंदाजी करताना अर्जुनने केवळ चार धावा दिल्या.
गेल्या काही दिवसांपासून अर्जुन सातत्याने त्याचा बाबा सचिन तेंडुलकरसोबत प्रशिक्षण घेत आहे. अर्जुन हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तसेच तो खालच्या क्रमांकावर फलंदाजी देखील करतो. अर्जुन प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए सामन्यांमध्ये यापूर्वी खेळला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा अर्जुनचा पहिलाच सामना आहे.
MI vs KKR: दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग-११
मुंबई इंडियन्स: सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, कॅमेरून ग्रीन, नेहाल वढेरा, कुमार कार्तिकेय, रायली मेरेडिथ/, अर्शद खान, पियुष चावला, हृतिक शोकीन, दुआन यान्सन
कोलकाता नाईट रायडर्स: जेसन रॉय, एन जगदीसन (यष्टीरक्षक), नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन / टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती.