भारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. तो हंगाम संपुष्टात आल्यानंतर BCCIने लगेच पुढच्या हंगामाची तयारी सुरू केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच IPL गव्हर्निंग कौन्सिलने १८ फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया पार पडेल असं स्पष्ट केलं. १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी अनेक नवख्या खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरचाही या लिलावात समावेश आहे. २० लाख रुपये त्याची मूळ किंमत आहे. लिलाव प्रक्रियेला दुपारी ३ वाजता प्रारंभ होईल. प्रत्येक संघात कमाल २५ खेळाडूंना स्थान देता येते.

लिलावासाठी खेळाडूंच्या नोंदणीची मुदत गुरुवारी संपली असून, यात ८१४ भारतीय आणि २८३ परदेशी खेळाडूंचा यात समावेश आहे. यात वेस्ट इंडिजच्या सर्वाधिक ५६ क्रिकेटपटूंचा समावेश आहे. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे ४२ आणि दक्षिण आफ्रिकेचे ३८ खेळाडू उपलब्ध आहेत. संलग्न राष्ट्रांच्याही २७ खेळाडूंची यात नोंद आहे.

१८ फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावासाठी बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आणि भारताच्या एस. श्रीसंथ यांच्यासह १०९७ क्रिकेटपटूंची नोंद झाली आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांनी लिलावातून माघार घेतली आहे. हरभजन सिंग, केदार जाधव, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मोईन अली, सॅम बिलिंग्स, जेसन रॉय, मार्क वूड, लियाम प्लंकेट आणि कॉलिन इनग्राम यांचा दोन कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह समावेश करण्यात आला आहे.