मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा सध्या भारतीय क्रिकेटमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने युवा (१९ वर्षाखालील) आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण त्या दौऱ्यावर त्याला फारशी उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. मात्र सध्या सुरु असलेल्या विनू मंकड चषक स्पर्धेत त्याने आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे.
नुकत्याच झालेल्या मुंबई विरुद्ध आसाम या सामन्यात त्याने टिपलेल्या ३ बळींच्या जोरावर मुंबईने आसामला केवळ ९९ धावांवर रोखले. या सामन्यात अर्जुनने ७ षटके फेकली. या गोलंदाजीत त्याला २ षटके निर्धाव टाकण्यात यश आले. एकूण ७ षटकात त्याने केवळ १४ धावा खर्चिल्या आणि त्या मोबदल्यात आसामचे ३ गडी तंबूत धाडले. मुंबईच्या गोलंदाजीत अर्जुनने सर्वाधिक बळी टिपले.
मुंबईने या स्पर्धेत आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना ४ सामन्यात विजय मिळाला आहे तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईकडून अर्जुनच्या नावे सर्वाधिक १३ बळी आहेत.
दरम्यान, आसामने दिलेले १०० धावांचे आव्हान मुंबईच्या फलंदाजांनी १० गडी राखून २२ षटकात सहज पूर्ण केले. सलामीवीर यशस्वी जैस्वालने केलेले नाबाद अर्धशतक आणि सुवेद पारकरची नाबाद ४१ धावांची खेळी यांच्या बळावर मुंबईने आसामवर विजय मिळवला.