एखाद्या गोष्टीची आठवण होते अरएिर ती चिरंतन स्मरणात राहते, यामागे त्या घटनेची विशिष्ट प्रतिमा कारणीभूत असते. भव्य क्रीडा स्पर्धा असो किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा चित्रपट पुरस्कार सोहळा एक शुभंकर त्या सोहळ्याची ओळख बनतो. शुभशकुन असणारा आणि सकारात्मक ऊर्जेने लक्ष वेधणारी ही प्रतिमा कधी व्यंगचित्रात्मक पात्र असते तर कधी स्थानिक प्राण्याची प्रतिकृती. फ्रान्समधल्या प्रोव्हेन्स आणि गॅसकोनी प्रांतात बोलीभाषेत वापरला जाणारा शब्द म्हणजे मॅस्कॉट. ज्याचा अर्थ होतो शुभसंकेत आणणारा. मॅस्को शब्दापासून रूढ झालेला हा शब्द. १८८०मध्ये इडमंड ऑड्रनने या लेखकाने मॉसकोटे नावाची व्यंगात्मक चित्रांची मालिका तयार केली होती.
फुटबॉल विश्वचषक हा जगातील सर्वात मोठय़ा सोहळ्यांपैकी एक. जगातल्या सर्वाधिक देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या देशांमधून मोजक्या ३२ देशांना विश्वचषकात खेळण्याची संधी मिळते. चार वर्षांनी येणारा हा महासोहळा आणि जेतेपदाच्या झळाळता चषकासह हजारोंची स्वप्न साकारणारा तो संघ हा ठेवा कायमच आपल्या मनात बरोबर असतो. मात्र त्याच वेळी हा सोहळा एका स्मृतिचिन्हाच्या माध्यमातून आपल्या मनावर कोरला जातो. यंदाचा विश्वचषक होतोय सांबा नृत्यावर जगणाऱ्या उत्साही ब्राझीलमध्ये. जैवविविधतेची शिस्तबद्ध जपणूक करणाऱ्या देशांमध्ये ब्राझीलचा समावेश होतो. ब्राझीलमध्ये आढळणारा आर्मडिल्लो (खवल्या मांजरसदृश) हा असाच दुर्मीळ प्रजातीमधील प्राणी. त्याची माहिती लोकांना कळावी, संवर्धन व्हावे या उद्देशाने आर्मडिल्लोलाच विश्वचषकाचा शुभंकर बनवण्यात आले. ‘टॉलिपेयुटस टिकनीटस’ असे कठीण शास्त्रीय नाव असलेला करडय़ा रंगाचा पाठीवर तीन पट्टे असणारा हा प्राणी फुटबॉलच्या चेंडूच्या आकारात अवतरतो. आकर्षक रंगसंगतीने नटलेल्या आर्मडिल्लोला ‘फुलेको’ असे गोंडस नाव देण्यात आले. ‘फ्युटेबॉल’ आणि ‘इकॉलॉजिआ’ या इंग्रजी अक्षरांपासून तयार झालेला फुलेको. विश्वचषकादरम्यान मानवी रूपातला फुलेको प्रत्येक मैदानावर असतो. टीव्हीवरच्या प्रक्षेपणादरम्यान माहिती पुस्तिकांवर स्पर्धेशी निगडित सर्व गोष्टींवर त्याचा मुक्त संचार आहे. आबालवृद्धांना आकर्षित करील, असा हा फुलेको पुढच्या विश्वचषकापर्यंत आपली साथ देणार आहे. २०१२मध्येच विश्वचषकाच्या प्रक्षेपणाचे हक्क असलेल्या टीव्ही ग्लोबो कंपनीने फुलेकोला सादर केले.
बदलत्या काळानुसार शुभंकर आधुनिक विपणनशास्त्रातील ब्रॅण्डिंगचा आधारस्तंभ ठरला आहे. सोहळ्यादरम्यान खराखुरा प्राणी आणणे शक्य नाही, हे लक्षात घेऊन अॅनिमेशनद्वारे खऱ्याखुऱ्या प्राण्याशी साधम्र्य साधणारी प्रतिमा तयार केली जाते किंवा सजीव माणूसच या शुभंकरच्या रूपात वावरतो. शुभंकराचे अॅनिमेशन पात्र ठरवण्यासाठी त्याचा आकार, उंची, कपडे, रंगसंगती हे ठरवण्यासाठी तज्ज्ञांचे एक मोठे पथक कार्यरत असते. शेकडो संकल्पना, सादरीकरण यातून एका पात्राची निवड होते. ज्या देशात स्पर्धा होणार आहे त्या देशाची संस्कृती, पर्यावरण यांना प्राधान्य देण्यात येते. फुलेकोच्या निर्मित्तीवरही हजारो रुपये खर्च करण्यात आले आहेत. फिफाने आर्मडिल्लोच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांप्रति कोणतेही योगदान दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ‘पर्यावरण संवर्धन’ असा नारा देत व्यावसायिक नफा कमावण्याचा छुपा प्रयत्नही उघड झाला आहे. काही दिवसांपूर्वीच फुलेकोच्या रूपातील व्यक्ती अश्लील नृत्य करताना आढळल्याने जोरदार टीका झाली होती.
फुटबॉल विश्वचषकात शुभंकरांची परंपरा १९६६ विश्वचषकापासून सुरुवात झाली. इंग्लंडच्या राजचिन्हातही असलेला विली सिंह या विश्वचषकाचा शुभंकर होता. ‘युनियन फ्लॅग’ जर्सी आणि त्यावर वर्ल्डकप अक्षरे हे या शुभंकराचे स्वरूप होते. लहान मुलांसाठीच्या पुस्तकात चित्र रेखाटणारे रेग होय यांनी या पहिल्यावहिल्या शुभंकराची निर्मित्ती केली होती. १९७० साली मेक्सिकोत झालेल्या विश्वचषकात मेक्सिकोची जर्सी आणि मुकुटासारखी टोपी घातलेला ज्युआन शुभंकराच्या भूमिकेत होता. १९७४मध्ये पश्चिम जर्मनीत झालेल्या विश्वचषकात जर्मनीची जर्सी घातलेली दोन मुले शुभंकर होती. अर्जेटिनात झालेल्या १९७८च्या विश्वचषकात अर्जेटिनाची जर्सी, टोपी परिधान केलेला मुलगा शुभंकर होता.
१९८२साली स्पेनमध्ये झालेल्या विश्वचषकात संत्र हे फळच स्पेनमध्ये ‘ऑरेंज’ शुभंकर ठरले होते. १९८६ साली मेक्सिकोत झालेल्या विश्वचषकात मेक्सिकोच्या पर्यावरण संस्कृतीचा भाग असलेल्या ‘जलापेनो पेपर’ नावाचे मिरचीसारखे फळ शुभंकराच्या भूमिकेत होते. मेक्सिकन पद्धतीची टोपी आणि मिशी या मिरचीला देण्यात आली होती. १९९०मध्ये इटली विश्वचषकात शुभंकराच्या स्वरूपात बदल झाला. रेषांचे साधे रेखाटन असलेला माणूस शुभंकर होता. त्याचे डोके फुटबॉलच्या चेंडूसारखे होते आणि शरीर यजमान इटलीच्या झेंडय़ाने सजलेले होते. १९९४ साली अमेरिकेत झालेल्या विश्वचषकात चक्क लाल, निळा आणि पांढरे कपडे परिधान केलेला कुत्रा शुभंकर होता. १९९८मध्ये फ्रान्स विश्वचषकात निळ्या रंगाचा कोंबडा शुभंकर होता. यजमान देशाच्या राष्ट्रीय चिन्हांमध्ये समावेश असलेल्या या कोंबडय़ाच्या शरीरावर फ्रान्स ही अक्षरे रेखाटण्यात आली होती.
२००२चा विश्वचषक जपान आणि दक्षिण कोरिया यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता. संगणकीकरणाचा थेट प्रभाव या शुभंकरावर जाणवला. अॅनिमेशनद्वारे निर्मित तीन पात्रे शुभंकर बनली होती. अटो हे प्रशिक्षक आणि त्यांचे काझ आणि निक नावाचे विद्यार्थी असे याचे स्वरूप होते. नािरगी, जांभळा आणि निळ्या रंगातील या त्रिकुटाने धमाल आणली होती. २००६ जर्मनी विश्वचषकात पिले नावाचा सिंह शुभंकर होता. २०१०मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात हिरव्या आणि सोनेरी रंगातला झाकुमी नावाचा बिबटय़ाने चाहत्यांना आकर्षित केले होते.
शुभंकरोती
एखाद्या गोष्टीची आठवण होते अरएिर ती चिरंतन स्मरणात राहते, यामागे त्या घटनेची विशिष्ट प्रतिमा कारणीभूत असते. भव्य क्रीडा स्पर्धा असो किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा चित्रपट पुरस्कार सोहळा एक शुभंकर त्या सोहळ्याची ओळख बनतो.
First published on: 25-06-2014 at 02:07 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Armadillo unveiled as mascot for 2014 world cup in brazil