जाफरचा सलग तीन दुहेरी शतकांचा विश्वविक्रम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘क्रिकेटपटू वासिम जाफरचा पुतण्या’ ही ओळख पुसून टाकत १७ वर्षीय अरमानने सलग तीन द्विशतके झळकावण्याचा विश्वविक्रम रचला आणि क्रिकेट विश्वात आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. १९-वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पध्रेमध्ये त्याने कर्नाटकविरुद्ध खेळताना तिसरे द्विशतक लगावत हा पराक्रम दाखवला.
या स्पर्धेतील बडोदाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ५६ धावा केल्या होत्या. त्रिपुराविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने १७४ धावांची खेळी साकारली होती. पण त्यानंतर त्याने सलग तीनदा द्विशतकाची वेस ओलांडली. मध्य प्रदेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने २२४ धावा केल्या, त्यानंतर ओदिशाविरुद्धच्या सामन्यात त्याने २२३ धावा केल्या. त्यानंतर कर्नाटकविरुद्धच्या पाचव्या सामन्यात नाबाद २१८ धावांची खेळी साकारली. या पाच सामन्यांमध्ये त्याने २२३.७५ च्या सरासरीने ८९५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या फिरकीच्या जोरावर त्याने ९ बळीही मिळवले आहेत.
यापूर्वी २०१० साली आंतरशालेय क्रिकेटमध्ये रिझवी शाळेकडून खेळताना अरमानने ४९८ धावांची खेळी साकारली होती. आंतरशालेय क्रिकेटमधला हा विक्रमही त्याने रचला होता. या वेळी त्याने काका वसिमचा ४०३ धावांचा विक्रम मोडीत काढला होता. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अशी कामगिरी कोणत्याही फलंदाजाला करता आलेली नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकाराने सलग चार शतके लगावली होती. कसोटी क्रिकेटमध्ये राहुल द्रविड, युनूस खान, एव्हर्टन विक्स, डॅक फ्लिंगटन आणि एलन मेलिव्हले यांनी सलग चार शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे.
मुंबईच्या रणजी संभाव्य संघात अरमानची निवड झाली होती, पण त्याला अंतिम १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले नाही. या देदीप्यमान खेळींमुळे अरमानने पुढील वर्षी होणाऱ्या १९-वर्षांखालील विश्वचषकासाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arman done record in cricket match