जागतिक स्पर्धेचा पात्रता निकष पार करण्यात अपयशी

लखनौ : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा भारताचा तिहेरी उडीपटू अरपिंदर सिंग याने बुधवारी ५९व्या राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. पण जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठीचे पात्रता निकष पार करण्यात तो अपयशी ठरला.

अरपिंदरने या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करत १६.८३ मीटर इतकी उडी मारली. मात्र पीएसी स्टेडियमवरील अतिउष्ण आणि दमट वातावरणात तो जागतिक स्पर्धेचा १६.९५ मीटरचा पात्रता निकष पार करण्यासाठी १२ सेंमी इतका कमी पडला. कर्नाटकच्या यू. कार्तिक आणि तामिळनाडूच्या मोहम्मद सलाहुद्दीन यांनी अनुक्रमे १६.८० मीटर आणि १६.७९ मीटर इतकी कामगिरी करत अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.

बालाकुमार नितीन आणि अ‍ॅलेक्स अँथनी यांनी अव्वल धावपटूंच्या अनुपस्थितीत अनुक्रमे पुरुषांच्या २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. नितीनने २०.९१ सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक प्राप्त केले.

भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने या स्पर्धेसाठी काही परदेशी अ‍ॅथलिट्सना निमंत्रित केले होते. त्यापैकीच इराणच्या मेहदी पिरजाहन याने पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीचे विजेतेपद पटकावताना नव्या स्पर्धाविक्रमाची नोंद केली. त्याने ४९.३३ सेकंद अशी वेळ दिली. महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पी. यू चित्रा हिने आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना सुवर्णपदक पटकावले.

Story img Loader