सॅमीने वाचला अन्यायाचा पाढा; अखेरचा विश्वचषक खेळणार असल्याचा वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाला इशारा दिल्याची कबुली
विश्वचषक सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडिजचे क्रिकेट मंडळ आणि खेळाडू यांच्यामध्ये मानधनाबाबत वाद निर्माण झाला होता. मंडळाने खेळाडूंना झुकवत त्यांच्या मानधनात कपात करण्याचा निर्णय घेतला होता; पण खेळाडूंना विश्वचषक खेळायचा असल्यामुळे त्यांनी या लादलेल्या शर्ती मान्य केल्या; पण या वेळी वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीने मंडळाला एक पत्र लिहिले. यामध्ये त्याने हा विश्वचषक शेवटचा असल्याचे लिहिले होते.
याबाबत सॅमी म्हणाला की, ‘‘विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपल्यावर मंडळाने आमच्या मानधनात कपात करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आम्हाला मान्य नव्हता; पण T20 विश्वचषकासारख्या स्पर्धेत खेळायचे असल्याने आम्ही त्यांचा हा निर्णय अखेर मान्य केला, पण त्याच वेळी मी मंडळाला एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये जर हे असेच चालू राहिले तर माझी ही शेवटची स्पर्धा असेल, असे लिहिले होते. मी कर्णधाराला साजेशी कामगिरी करून दाखवली. आता निर्णय मंडळाच्या हातामध्ये आहे.’’
या प्रतिक्रियेसह सॅमीने आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाट मोकळी करून दिली. त्यापुढे जाऊन एक खुलासा करताना सॅमी म्हणाला, ‘‘विश्वचषकाला जाण्यापूर्वी संघाला सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी प्रत्येक क्रिकेट संघटना कटिबद्ध असते; पण तुम्हाला विश्वास बसणार नाही की, आम्ही विश्वचषकासाठी भारतामध्ये आलो तरी आम्हाला टी-शर्ट, टोप्या मिळाल्या नव्हत्या, अन्य सुविधा तर दूरच होत्या. आम्ही व्यवस्थापकांना ही गोष्ट सांगितली आणि त्यांनी आम्हाला या गोष्टी लवकर मिळवून दिल्या, त्यामुळे या विजयात त्यांचेही योगदान आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा