जॅक विलशेअरने दुसऱ्या सत्रात केलेल्या गोलमुळे अर्सेनलने पराभवाची नामुष्की टाळली आणि इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली. अर्सेनलने वेस्टब्रूमविच अल्बियानविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. आतापर्यंत अव्वल स्थान पटकावणाऱ्या टॉटनहॅम हॉट्सपरला वेस्टहॅम युनायटेडकडून ०-३ असे पराभूत व्हावे लागल्याने त्यांची गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.
प्रीमिअर लीगमध्ये आता बलाढय़ संघांची वर्चस्व मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. यजमान वेस्टब्रूमविच संघाने क्लॉडियो याकोब याने ४२व्या मिनिटाला झळकावलेल्या गोलाच्या बळावर आघाडी घेतली होती. निकोलस अनेल्काने दोन वेळा आक्रमक चाली रचत अर्सेनलवर दडपण आणले. मात्र अर्सेनलचा गोलरक्षक डब्ल्यू. साझेनी याने अनेल्काने प्रयत्न धुडकावून लावत वेस्टब्रूमविचला मोठी आघाडी मिळवून दिली नाही. विलशेअरने ६३व्या मिनिटाला सुरेख गोल रचत अर्सेनलला बरोबरी मिळवून दिली. अर्सेनलची १० सामन्यांची विजयी परंपरा खंडित झाली असली तरी प्रशिक्षक आर्सेन वेंगर यांनी एका गुणावरही समाधान व्यक्त केले.
विन्स्टन रेड, रिकाडरे वाझ टे आणि राव्हेल मॉरिसन यांनी दुसऱ्या सत्रात १३ मिनिटांत केलेल्या तीन गोलमुळे वेस्ट हॅमने टॉटनहॅमचा पराभव केला. वेस्ट हॅम युनायटेडचा हा १९९९नंतरचा टॉटनहॅमवरील आणि प्रीमिअर लीगच्या या मोसमातील पहिला विजय ठरला. या विजयामुळे या मोसमातून बाहेर पडण्याची नामुष्की वेस्टहॅम येणार नाही. टॉटनहॅमच्या आक्रमक खेळाला वेस्टहॅमने तोडीस तोड उत्तर दिले. टॉटनहॅमचा वेस्टहॅमचा बचाव भेदता आला नाही. स्टीव्हर्ट डावनिंगने कॉर्नरवरून दिलेल्या क्रॉसवर विन्स्टनने ६३व्या मिनिटाला वेस्टहॅमचे खाते खोलले. त्यानंतर सहा मिनिटांनी रिकाडरे याने दुसऱ्या गोलाची नोंद केली. मॉरिसनने सुरेख खेळाचे प्रदर्शन करत स्वत:च्या कौशल्याच्या बळावर गोल करून वेस्टहॅमच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, सेरी ए स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत ज्युवेंट्सने एसी मिलानचा ३-२ असा पराभव केला. ज्युवेंट्सचा हा सलग चौथा विजय ठरला. ज्युवेंट्सने रोमा आणि नापोलीपाठोपाठ तिसरे स्थान पटकावले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा