अवघ्या आठ दिवसांपूर्वी इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेच्या लढतीत लिव्हरपूलने अर्सेनेलचा ५-१ असा धुव्वा उडवला होता. अर्सेनेलसारख्या मातब्बर संघावर लिव्हरपूलचे दणदणीत वर्चस्व चकित करणारे होते. मात्र चाहत्यांच्या मनात हा पराभव ठसण्याआधीच अर्सेनेलने या जिव्हारी लागणाऱ्या पराभवाची परतफेड केली. एफए चषक फुटबॉल स्पर्धेत अर्सेनेलने लिव्हरपूलवर २-१ असा विजय मिळवला आणि त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले आहे.
२००५मध्ये एफए चषक जिंकल्यानंतर अर्सेनेलला कोणत्याही मोठय़ा स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा करता आलेला नाही. १६व्या मिनिटाला अलेक्स ओक्सलेड चेंबरलेनने अर्सेनेलतर्फे सलामीचा गोल केला. त्यानंतर ४७व्या मिनिटाला चेंबरलेनने लिव्हरपूलच्या डॅनियल अगरचा बचाव भेदत चेंडू ल्युकास पोडोलस्कीकडे सोपवला.
पोडोलस्कीने सुरेख गोल करत त्याने अर्सेनेलला आघाडी मिळवून दिली. लिव्हरपूलतर्फे स्टीव्हन गेरार्डने ६०व्या मिनिटाला गोल केला. मात्र यानंतर अर्सेनेलने बचाव भक्कम करत लिव्हरपूलला रोखत विजयावर शिक्कामोर्तब केले.

Story img Loader