अर्सेनलने न्यूकॅस्टलवर १-० असा विजय मिळवीत इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत ७३ गुणांसह चौथ्या क्रमांकावर मजल मारली. या कामगिरीमुळे अर्सेनलचे चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील सहभागाचे तिकीट निश्चित झाले. मँचेस्टर युनायटेडला वेस्टब्रूमविच अल्बियानविरुद्धच्या सामन्यात ५-५ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागल्याने त्यांना प्रशिक्षक सर अ‍ॅलेक्स फग्र्युसन यांना गोड निरोप देता आला नाही.
पुढील मोसमाच्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी प्रशिक्षक अर्सेन वेंगर यांच्या अर्सेनल संघाला तीन गुणांची आवश्यकता होती. लॉरेन्ट कोसिएनीने ५२व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे अर्सेनलला विजय नोंदवता आला. टॉटनहॅमला संडरलँडवर १-० असा विजय मिळवता आला तरी त्यांना पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ‘‘गेल्या दोन महिन्यांत खेळाडूंनी केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळेच आम्हाला
चॅम्पियन्स लीगमध्ये मजल मारता आली,’’ असे वेंगर म्हणाले.
फग्र्युसन यांनी युनायटेडच्या अखेरच्या आणि १५००व्या सामन्यात प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली, पण ५-२ अशा आघाडीनंतरही त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. अल्बियान संघाने शेवटच्या नऊ मिनिटांत तीन गोल करत युनायटेडच्या आनंदावर पाणी फेरले. शिंजी कागावा (पाचव्या मिनिटाला), जोनस ओल्सन (नवव्या मिनिटाला), अलेक्झांडर बटनर (३०व्या मिनिटाला), रॉबिन व्हॅन पर्सी (५३व्या मिनिटाला) आणि जेवियर हेर्नाडेझ (६३व्या मिनिटाला) यांनी युनायटेडसाठी गोल केले. अल्बियानकडून जेम्स मॉरिसन (४०व्या मिनिटाला), युसूफ मुलुम्बू (८१व्या मिनिटाला) आणि रोमेलू कुकाकू (५०व्या, ८१व्या आणि ८६व्या मिनिटाला) यांनी गोल झळकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा