चेल्सीचा डायनामो किव्ह संघावर विजय
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करण्याचे अर्सेनेलचे स्वप्न मावळले आहे. बलाढय़ बायर्न म्युनिक संघाने अर्सेनेलचा ५-१ असा धुव्वा उडवला. या दारुण पराभवामुळे अर्सेनेलला चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या बाद फेरीतील स्थानासाठी गणितीय समीकरणांवर अवलंबून राहावे लागणार आहे. अन्य लढतीत चेल्सीने डायनामो किव्हवर २-१ असा निसटता विजय मिळवला. झेनिट सेंट पीटर्सबर्ग संघाने लॉयन संघावर २-० मात करत विजयी परंपरा कायम राखली. बार्सिलोनाने बेट बोरिसाव्हला ३-० असे नमवले.
अर्सेनेलविरुद्धच्या शेवटच्या लढतीत बायर्नला पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु पेप गार्डियोला यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघाने या पराभवाचा बदला घेतला. रॉबर्ट लेव्हानडोव्हस्कीने १०व्या मिनिटालाच गोल करत बायर्नचे खाते उघडले. थॉमस म्युलरने आणखी एक गोल केला. डेव्हिड अलाबाने मध्यंतराला एक मिनीट बाकी असताना बायर्नसाठी आणखी एक गोल केला. मध्यंतरानंतर म्युलरने आणखी एक गोल करत बायर्नची आघाडी भक्कम केली. ऑलिव्हर गिरोडने गोल करत अर्सेनेलचे खाते उघडले. अर्सेनेलच्या खेळाडूंना बायर्नच्या खेळाडूंचे चेंडूवरील नियंत्रण थोपवता आले नाही आणि बायर्नने दणदणीत विजय साकारला.
डायनामो संघाच्या अलेक्झांडर ड्रॅगोव्हिकने ३४व्या मिनिटाला स्वयंगोल केल्याने चेल्सीचे खाते उघडले. ७७व्या मिनिटाला ड्रॅगोव्हिकने आपल्या संघासाठी गोल करत बरोबरी केली. विल्यनने ८३व्या मिनिटाला निर्णायक गोल करत चेल्सीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, नेयमारचा दुहेरी धमाका आणि त्याला ल्युइस सुआरेझची मिळालेली साथ याच्या जोरावर बार्सिलोनाने बेट संघावर सहज विजय मिळवला.

Story img Loader