Arshad Nadeem Mother Reaction on Niraj Chopra : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक जिंकून दिलं आहे. त्यामुळे भारतात पाचवे पदक आले आहे. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८९.४५ मीटरवर भाला फेकला. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावले. टोक्यो ऑलम्पिकमध्ये सुवर्णवेध घेणाऱ्या नीरज चोप्राला यावेळी रौप्यपदक मिळाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान नीरजच्या पालकांचीही प्रतिक्रिया समोर आली. नीरज चोप्राच्या आईने आपल्या मुलाच्या रौप्यपदकाबद्दल आनंद व्यक्त करत असताना पाकिस्तानच्या अरशद नदीमबद्दलही भाष्य केले होते. तर, आता अर्शद नदीमच्या आईनेही नीरज चोप्राबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
नीरज चोप्राची आई काय म्हणाली होती?
नीरजला रौप्यपदक मिळाले असले तरी आम्ही खूप आनंदी आहोत. हेही सुवर्णपदक मिळण्यासारखेच आहे. तो जखमी होता, तरीही त्याने चांगली कामगिरी केली, याबद्दल आम्हाला आनंद आहे. तसेच पाकिस्तानच्या नदीमने सुवर्णपदक जिंकले, त्याबद्दलही आनंद वाटतो. सर्वच खेळाडू मला मुलासारखे आहेत.
हेही वाचा >> Neeraj Chopra : रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये…”
अर्शद नदीमच्या आईची प्रतिक्रिया काय?
नीरजही माझ्या मुलाप्रमाणेच आहे. तो नदीमचा मित्र असून त्याचा भाऊही आहे. जय पराजय हा खेळाचा भाग आहे. देव त्याच्यावर कृपादृष्टी ठेवो. त्यानेही अनेक पदकं जिंकावीत. ते भावाप्रमाणे आहे. मी नीरजसाठीही प्रार्थना करते, असं अरशद नदीमची आई म्हणाली.
"If mothers ran the world, there would be no hate, no wars. #ArshadNadeem's mother: 'Neeraj Chopra is like a son to me. I prayed for him too.' (courtesy indyurdu) #NeerajChopra's mother: 'We're happy with silver. The one who won gold (Arshad Nadeem) is also my child.'"… pic.twitter.com/IWM78tCwpI
— PTI GOJRA (@PTI_Gojra) August 9, 2024
रौप्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राची काय प्रतिक्रिया होती?
“देशासाठी आपण जेव्हाही पदक जिंकतो, तेव्हा आनंद होतो. रौप्य पदक जिंकलो, त्याचा आनंद आहेच. मात्र, सुवर्ण पदक हुकल्याचे दुख:ही कुठं तरी मनात आहे. पण आता स्वत:मध्ये सुधारणा करण्याची वेळ आहे. याबाबत टीम बरोबर बसून चर्चा करेन”, अशी प्रतिक्रिया नीरज चोप्राने दिली.
हेही वाचा >> Neeraj Chopra Mother: सुवर्णपदक हुकल्यानंतर नीरज चोप्राच्या आईचं पाकिस्तानच्या अर्शद नदीमबद्दल मोठं विधान; म्हणाल्या…
“यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सर्वच भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. कुणीही टोकियो ऑलिम्पिकमध्यल्या पदकांची तुलना या ऑलिम्पिमकमधल्या पदकांशी करू नये, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडूने त्यांच्या सर्वोत्तम खेळ केला आहे. प्रत्येक वेळी पदकांशी संख्या वाढेलच असं नसतं. पण येणाऱ्या काळात नक्कीच पदकांच्या संख्येत वाढ होईल, असा मला विश्वास आहे”, असेही तो म्हणाला.